प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
आज ताई अशा का झोपून आहेत?”
तुळशीने गुलाबाला विचारले.
“बरं नसावे बहुधा…”
गुलाब सहज बोलून गेला.
“कितीही आजारी असल्या, तरी सकाळी बिछान्यातून उठल्यावर आपल्या अंगावरून हात फिरवतात आणि मगच घरात जातात.”
“होय पण… उठल्या तर हात फिरवतील ना…”
“ते खरंच… मग आपण काय करूया?”
“आपण काय करू शकणार म्हणा?”
“मी माझी काही पानं उडवू का, त्यांच्या अंगावर म्हणजे त्यांना जाग येईल?”
“तू कशी काय पानं उडवणार… तुला त्या वाऱ्याची मदत घ्यावी लागेल ना?”
“खरं आहे बाबा. अशा वेळेस किती अगतिकता जाणवते, स्वतःविषयी!”
“आपण साधं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून, आम्ही सोबत असल्याचं दाखवून पण देऊ शकत नाही, याचं वाईट वाटतं.”
“जाऊ दे आपण वाट पाहूया…ताई उठतीलच!”
चार दिवस आजारपणामुळे बिछान्यावर झोपून आहे. घरात माणसे आहेत, कामवाल्या आहेत. त्या येतात-जातात. सगळे सुरळीत सुरू आहे. मला कोणीही कोणतेही काम करायला सांगत नाही, उलट हातात आयते वाढलेले ताट येते. चहा-पाणी वेळेवर मिळते. मला तपासायला घरातल्यांनीच डॉक्टरांना बोलावले. त्यांनी लिहून दिलेली औषधं आणून मला कशी घ्यायची, तेही समजावून सांगितले, तरीही कधी कधी मनात विचार येतोच की, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही. जेव्हा आजारपण येते, तेव्हा हा विचार जास्तच आसपास घोटाळतो. हा केवळ शारीरिक दुखण्याचा भाग झाला; पण जेव्हा माणसाचे मानसिक संतुलन बिघडते, तेव्हा त्याच्या मनात नेमके कोणते विचार येत असतील, असाही विचार मनाला शिवून गेला. आपल्या आसपास सजीव-निर्जीवसृष्टी आहे. ही सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक जण आपल्याविषयी काय विचार करतो, असाही विचार मनात आला. मग मी रोज पाणी घालत, आजतागायत जगवलेल्या झाडांच्या मनात माझ्याविषयी काय भावना असतील, या विषयीचा कुंडीतल्या झाडांचा आपसातील संवाद असूही शकेल, असे वाटून गेले.
मी रोज वापरत असलेली भांडी, मी ज्या खुर्चीवर बसून वाचन करते ती खुर्ची, मी ज्या टेबलावर वही ठेवते ते टेबल, मी ज्या पेनाने लिहिते ते पेन आणि अशा अनेक गोष्टी ज्या मी रोज हाताळते, त्यांना मी काही दिवस हाताळले नाही, तर त्यांच्या मनात नेमके काय येत असेल? असा विचार मनात आला आणि स्वतःचेच हसू आले. निर्जीवांना मन असते का? हा परिसंवादाचाही विषय होऊ शकत नाही, कारण १०० टक्के लोक निर्जीवांना मन नसते, असेच म्हणतील!
मला अजूनही आठवतेय की, एकदा माझा नवरा गाडी चालवत होता आणि कुठची तरी स्कूटर गाडीला जवळून स्पर्श करून गेली. त्याने गाडी बाजूला घेतली. खाली उतरून गाडी तपासली आणि गाडीवर उमटलेला एक हलकासा खराटा उठला होता, जो बारीक नजर करून पाहिल्याशिवाय दिसतही नव्हता, त्यावर किती तरी वेळ प्रेमाने तो हात फिरवत राहिला. आज या घटनेचा मी विचार करते आहे की, त्याच्या या कृतीने त्या गाडीला नेमके काय वाटले असेल किंवा ही कृती करताना त्याच्या मनात कोणते भाव असतील…!
मूळ विषय काय आहे की, कोणी तरी आपल्याविषयी आस्था ठेवून आहे. आपल्याविषयी कोणाच्या तरी मनात प्रेमभावना आहे. आपले उठणे, बसणे, हसणे, रडणे, खाणे-पिणे गप्पागोष्टी करणे या सगळ्या क्रिया आपण करताना कोणी तरी त्याकडे लक्ष ठेवून आहे, असे आपल्याला आतून वाटणे स्वाभाविक आहे. आपल्याला कोणी तरी लाड करून द्यावे, असे वाटत राहते. मग भले ते शाब्दिक का असेना. सारखे आपले कौतुक करावे असे वाटते. मग ते खोटे का असेना! फक्त असे वाटत असताना, आपण हे का लक्षात ठेवू नये की, जशी आपली भावना आहे, तशीच आपल्या आसपासच्या माणसांची सुद्धा आपल्याकडून असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Action and reaction are equal and opposite.या न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, आपण थोडासा विचार करूया की, आतापर्यंत आपल्या माणसांसाठी काय केले आहे. जेणेकरून आपली माणसे आपल्यासाठी ते करतील? आतापर्यंत जे झाले ते झाले. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण की, आपल्याला काही तरी मोलाचे लक्षात आले आहे. आपण आजपासून त्याची सुरुवात करूया की, आपल्याला जे समोरच्या माणसाकडून अपेक्षित आहे, ते त्या समोरच्या माणसाला आपल्याकडून आधी देऊया!