क्राइम – अॅड. रिया करंजकर
उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतामध्ये अजूनही काही पद्धती या रीतीरिवाजानुसार चालत आल्या आहेत. अशा अनेक गावांमध्ये मुलं आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुला-मुलीशी लग्न करतात. सुरेश हा रामलाल आणि सीता यांचा थोरला मुलगा. सुरेश हा मुंबईमध्ये एका प्रायव्हेट बँकेमध्ये नोकरी करत होता. सुरेशचं लग्नाचं वय झाल्यामुळे रामलाल यांच्या नातेवाइकांनी गावच्या मुलीचं स्थळ सुचवलं होतं. मुलगी चांगली आहे असे समजताच, त्यांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला. रीतीरिवाजाप्रमाणे सुरेशला गावी न घेऊन जाता नातेवाईक मुलगी बघण्यासाठी गावाला गेले. मुलीला दाखवण्याचाही कार्यक्रम केला. मुलगी दिसायला सुंदर असल्यामुळे गावीच लग्नाची तारीख ठरवली. मुंबईला परत येताना मुलीचा फोटो सुरेशला दाखवण्यासाठी आणला. सुरेशने मुलीचा फोटो बघताचक्षणी पसंत केले. लग्न गावामध्ये पार पडलं. मुलीचा डोक्यावर पदर असल्यामुळे, सुरेशला तिला नीट बघता आले नाही. सुरेशला त्यावेळी जरा मुलीची शंका येऊ लागली. कारण फोटोत बघितलेली मुलगी वेगळी दिसत होती. त्यामुळे सुरेशने चौकशी केली असता, त्याला असे सांगण्यात आले की, मुलीने आज मेकअप केला आहे. ती जरा तब्येतीने झालेली आहे. आई-वडिलांनी मुलगी पसंत केल्यामुळे, सुरेशने काही प्रश्न विचारले नाहीत.
या समाजामध्ये गवना नावाचा प्रकार असतो. त्याच्यामुळे एका वर्षानी ती मुलगी नांदायला सासरी येणार होती. त्यामुळे सुरेश लग्न झाल्यावर मुंबईला आला. त्यानंतर सुनीता हिच्या बरोबर तो फोनवर बोलू लागला. पण ती नेमके शब्द बोलायची. कदाचित घरात लोक असतील म्हणून ती बोलायचं टाळत असेल, असं त्याला वाटलं आणि म्हणून तो व्हाॅट्सअॅपवरून तिला मेसेज करू लागला, तर मेसेजला ती उत्तर देत होती. ती बारावी शिकली असल्यामुळे, कोणाला मेसेज कळू नये म्हणून सुरेश इंग्लिशमध्ये टाईप करायचा, त्या मेसेजला ती इंग्लिशमध्येच उत्तर देत होती. एक वर्ष झाल्यानंतर सुरेशच्या घरातील लोक सुनीताला आणायला गावाला गेले असता, मुलगी खरोखरच बदलली आहे, असे त्यांना वाटू लागले. पण आता लग्न तर झालं होतं. त्यावेळी त्यांना असं कळलं की, जेव्हा गावात लग्न झालं होतं, त्यावेळी त्यांच्या घरातील एक मुलगी घरातच ठेवली होती. तिला बहिणीच्या लग्नासाठी सुनीताच्या वडिलांनी आणलेलं नव्हतं. दोन-तीन दिवस हा लग्नाचा कार्यक्रम चालू होता आणि ती तरुण मुलगी घरात मात्र एकटी होती. यावरून त्यांना शंका येऊ लागली, तरी पण सासरच्या मंडळींनी जाऊ दे, ही मुलगी चांगली आहे, असा विचार करून, तिला नांदायला मुंबईला घेऊन आले.
मुंबईला घेऊन आल्यानंतर ती कोणाशी काहीच बोलत नव्हती. कोणी जरी बोललं तरी हा आणि हो याच्याशिवाय उत्तर देत नव्हती. त्यामुळे सुरेशने काही कागदपत्र बनवताना तिला सही करायला सांगितलं, तर ती सरळ बोलली मला सही करता येत नाही. त्यावेळी मात्र सुरेशच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. सुरेश तिच्याशी काही बोलायला गेला किंवा घरातली लोकं काही बोलायला गेली की घाबरलेली असायची. त्याच्यामुळे या लोकांना नेमकं काय झालंय, तेच समजत नव्हतं. काही दिवसांनी घरातल्यांना समजलं की, लग्नामध्ये ही मुलगी बदललेली आहे, जी बोलत होती ती सुनीताची बहीण होती. सुनीताला घेऊन, सर्व सासरची मंडळी गावी जाऊन मिटिंगमध्ये घडलेला प्रकार सांगितला. गावातले लोक म्हणाले की, आता लग्न झालेले आहे. त्याच्यामुळे सुनीताच्या वडिलांना माफ करा. सुनीताला तिथेच ठेवून सुरेश आणि त्याचे कुटुंब मुंबईला आले. त्यांना असे वाटायचे की, थोडे दिवस माहेरी राहून, तरी हिच्यात बदल होईल. काही दिवसांनी असं समजलं की, सुनीताच्या वडिलांनी गावाकडे सुरेश आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात मेंटेनेसची केस दाखल केली होती. एक तर लग्न लावताना मुलगी बदलली आणि दोन महिने फक्त नांदवून सुरेशकडे २५ लाखांची मागणी सुनीताच्या वडिलांनी केली. सुरेशने सरळ सांगितले होते की, २५ लाख देण्याची माझी कॅपॅसिटी नाही; पण सुनीता मात्र नांदायला यायला तयार नव्हती.
त्यामुळे सुरेशने मुंबईमध्ये त्यांच्याविरुद्ध क्रोएल्टीमध्ये केस दाखल केली. एक गावाकडे आणि एक मुंबईला अशा दोन केस चालू झाल्या होत्या. मुलाकडील लोकांची फसवणूक होऊनही, ते मुलीला नांदवायला तयार होते, पण वडील मात्र मुलीला नांदवायला तयार नव्हते. ते पैसे घेण्यावरच अडून बसले होते. सुरेशला नंतर गावातून समजलं की, त्या मुलीच्या डोक्यात थोडा परिणाम झालेला आहे म्हणून ती कोणाशी जास्त बोलत नाही. तिच्या पुढील भविष्यासाठी त्यांनी तिचं लग्न केलं होतं. आपल्या मुलीशी लग्न कोण करणार, हा विचार करून, त्यांनी मेंटेनेसची रक्कम ही तिच्या भविष्यासाठी ते मागत होते. एवढा गुन्हा करूनही, ते फोटो दाखवलेली मुलगी हीच आहे, असं ठामपणे सांगत होते. त्याने आपल्या आई-वडिलांवर विश्वास ठेवला आणि लग्नाला तयार झाला. त्यांनी वेळीच मुलगी नीट पाहिली असती, तर हा प्रसंग ओढवलाच नसता.
(सत्यघटनेवर आधारित)