Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजतुम्ही असे पालक आहात का?

तुम्ही असे पालक आहात का?

मुलांच्या आयुष्यात पालकांच्या अतिदक्षतेमुळे मुलं स्वावलंबनापासून दूर जातात. त्यामुळे आपण पालकांनी आपली पालकत्वाची प्रतिमा थोडी विशाल करू या. मुलांना स्वतंत्र विचार करू द्या. प्रश्न कसे सोडवावेत, याचे पर्याय स्वतः शोधू देत. जेव्हा मुलं प्रश्न हाताळण्याचा अनुभव घेतील, तेव्हा ते अधिक आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने काम करतील. कुठलीही जबाबदारी झटकणार नाहीत.

विशेष – स्वाती गानू

मुलांना वेळ नाही, त्यांचा अभ्यासात स्पीड नाही, त्यांना शिक्षा होईल म्हणून त्यांचा गृहपाठ करताय. त्यांना शाळेतून दिलेल्या असाईनमेन्ट्स वेळेत पूर्ण होणार नाहीत म्हणून तुम्ही त्या पूर्ण करताय. मुलांचे प्रकल्प रात्रभर जागून पूर्ण करताय. मूल लोळतंय आणि तुम्ही त्याला धडा वाचून दाखवताय. मुलं शाळेत महत्त्वाच्या वस्तू न्यायला विसरली की, फोन करतात आणि तुम्ही हातातील काम सोडून पळत जाताय. शाळेत जाऊन सारखं सारखं शिक्षकांना भेटत असता. २४ तास मुलांमध्येच मग्न असता. या जगातील सर्व लेटेस्ट आणि ग्रेटेस्ट गोष्टी मुलांना देण्यासाठी पालक धडपडत असतात. मुलांना अडचण निर्माण होऊ नये, भांडणं सोडवू न देता, आपणच परिस्थिती ताब्यात घेता, तर तुम्ही snowplow parent आहात. हेलिकॉप्टर पॅरेन्ट तुम्ही ऐकले असेलच. यात पालकांचा मुलांवर सतत फोकस असतो.

अतिलक्ष असतं आणि snowplow parents हे कसे असतात, तर जसा रस्त्यावरील बर्फ बाजूला करून, रस्ता पूर्ण मोकळा केला जातो, तसे हे पालक मुलांच्या आयुष्यातील सगळे काटे, अडचणी, आव्हानं आधीच मुलांच्या मार्गातून दूर करतात. त्यांना वाटतं की, मुलांना कोणत्याही वेदना होऊ नयेत. अपयशाला सामोरं जावं लागू नये म्हणून ते मुलांना मदत करतात; पण खरं म्हणजे यामुळे हे पालक मुलांना कठीण परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं असतं, हे अतिशय गुंतागुंतीचं कौशल्य शिकण्यापासून वंचित ठेवत असतात.

हे पालक मुलांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून ते हस्तक्षेप करतात आणि मुलांसाठीच्या येणाऱ्या अडचणी पालक सोडवतात. हे जवळपास हेलिकॉप्टर पालक सारखेच असतात. हेलिकॉप्टर पालक मुलांचे अनुभव घेण्याची, विशेषतः यश-अपयशाची खूप जास्त जबाबदारी स्वतः घेतात.

स्नोप्लो पालक (Snowplow parents) हेलिकॉप्टर पालक यांच्या एक पाऊल पुढे असतात. हे पालक नुसते ओव्हर फोकस नसतात, तर ते मुलांच्या अडचणी स्वतः सोडवतात. त्यांची युद्धे जणू स्वतःच लढतात. मुलांना या गोष्टींपासून संरक्षण देतात. अलीकडच्या युगाला मानसिक आजाराने (anxiety age) त्रस्त म्हणावं अशी परिस्थिती आहे आणि मीडियामधून येणाऱ्या बातम्या वाचून, पाहून, ऐकून पालक धास्तावलेले असतात. हे जरी खरे असले, तरी २४ तास मूल कुठल्या तरी धोक्यात आहे, काही तरी भयंकर आजूबाजूला घडतंय, अशी काळजी करून काही साध्य होत नाही.

मोबाइलवर ‘पलपल की मुलांची घेतलेली खबर’, शिक्षकांकडून येणारे ई-मेल्स यामुळे आपण अतिसंपर्कात आहोत. चॅलेंजिंग सिच्युएशन्सना हाताळायची वेळच मुलांवर येऊ नये, याची काळजी पालक घेतात. यामुळे लवचिकता, जुळवून घेण्याच्या कौशल्याबाबत मुलं मागे पडतात.

मुलांचे सतत लाड केल्याने, मुलांना सारखं सांभाळत राहिल्याने त्यांना वाटतं की, मी एकट्याने काही करू शकणार नाही. मुलांना असहाय्य वाटतं. अशा अतिकाळजीमुळे कळत-नकळत पालक या अतिकाळजीचा वारसा मुलांपर्यंत पोहोचवत असतात. पालक आपल्या मुलांना खेळात, स्पर्धेत पुढे जाण्यासाठी जणू ढकलत असतात. पुढाकार घ्यायला लावतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -