Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडीराजकीय

Ajit Pawar group : अजित पवारांच्या पदरी घोर निराशा! दिल्लीवारीनंतरही राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपद नाही

Ajit Pawar group : अजित पवारांच्या पदरी घोर निराशा! दिल्लीवारीनंतरही राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपद नाही

नवी दिल्ली : देशात एनडीए (NDA) तिसर्‍यांदा सत्तास्थापन करणार असून आज संध्याकाळी सव्वासात वाजता नव्या मंत्रिमंडळाचा (Cabinet) शपथविधी सोहळा (Oath taking ceremony) पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिपदासाठी (Union Ministers) कोणाकोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. आता दिल्लीतून महायुतीच्या (Mahayuti) कोणत्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे, याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar's NCP) संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पदरी घोर निराशा आली आहे.


राज्यात अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर राज्यसभेत प्रफुल पटेल हे खासदार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणा एकाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, प्रफुल पटेल यांना अजूनही कोणताही फोन गेलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकल्यानंतरही मंत्रिपदाबाबत फोन आलेला नसल्याने अजित पवार गट मंत्री पदासाठी अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.


आज शपथ घेणार्‍या नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले आहे. मात्र, यात अजित पवार गटाच्या कोणालाच अद्याप फोन आलेला नाही. यासंबंधी सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडत आहे. या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल व सुनील तटकरे उपस्थित असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment