Friday, July 19, 2024

जाहिरातनामा

माेरपीस: पूजा काळे

गेल्या पंचवीस वर्षांत न् भूतो न् भविष्यति अशा तऱ्हेने जागतिकीकरणाच्या कक्षा रुंदावल्या. गरज ही शोधाची जननी असणाऱ्या या प्रवाहातल्या गरजा दिवसेंदिवस वाढीस लागल्या. संशोधन क्षेत्रात अतुलनीय बदल झाले, जे पुढे प्रगतीचा आलेख चढत गेले. यांत्रिकीकरणाने समृद्ध अशा जगाबरोबर भारताची पातळीही वर झेपावू लागली. विज्ञानाच्या प्रगतीने तर मानवाच्या राहणीमानाबरोबर इतर क्षेत्रात परिणामकारक बदल घडवले. नवीन सुधारित आवृत्त्यांमुळे, आय. टी. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर क्षेत्र लोकांना भुरळ पाडू लागली. अद्ययावत उपकरणांचा विषय घराघरांत प्रतिष्ठेचा बनला. पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने उच्चांक गाठला आणि आधुनिकतेचा चेहरा-मोहरा पालटला. घर, ऑफिस, बँकिंग क्षेत्र, ई-कोमर्स, सारं काही ॲडव्हान्स झाले. डिजिटल असिस्टंट अलेक्सा, कोर्टाना हातात हात घालून नांदू लागले. एकीकडे स्मार्टफोन हातातलं खेळणे झालं, तर कॉम्प्युटरने आवाज, चेहरा डिट्टो कॉपी करत बाजारात उसळी मारली.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात माहिती आणि प्रसारण सेवा देणाऱ्या दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य माध्यमामध्ये अपेक्षित बदल झाले, तेही यामुळेच. महितीवजा मनोरंजन करण्याऱ्या त्याच्या कार्यक्रमामुळे आपण त्याला परिचित होतो. आजही दूरदर्शनला दुसरा पर्याय नाही. त्याकाळी कृष्णधवल असणाऱ्या दूरदर्शन संचावर चित्रपट, हमलोग, हमपाच, रामायण, महाभारत, चित्रहार आणि श्वेतांबरासारखे कार्यक्रम होत. म्हणजे अथपासून इतिपर्यंत एका डबा वजा खोक्यातून पाहायचं, सहकुटुंब त्याचा आनंद घ्यायचा. रात्री १० वाजताच कार्यक्रमांची सांगता म्हणजे, अंथरूण गाठायला आपण सगळे तयार. कालपरत्वे या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे ब्लॅक अॅण्ड व्हाईट, कृष्णधवल जमाना मागे पडला. चंदेरी दुनियेच्या स्वागताला दूरदर्शनने नवरंग स्वीकारले. एकवीस इंचाऐवजी एकावन्न इंच, त्याहीपेक्षा मोठे टीव्ही संच आधी बाजारात आले. मग घरात आले. असंख्य वाहिन्यांचा सरमिसळ नजराणा उभा करताना त्यात अधिक कार्यक्रमांची भर पडली.

करमणुकीच्या धर्तीवर कैक वाहिन्यांची निर्मिती अन् निर्मितीबरोबर चुरस वाढली. काल परवाच रिलीज झालेले चित्रपट नेटफ्लिक्स, होटस्टार, एम् एक्स प्लेअरवर सर्रास पाहता येऊ लागले. बाजारातील उत्पादन लोकांसमोर आणताना, मौखिक प्रसिद्धीपेक्षा मार्केटिंगवर भर दिला गेला. डोळ्यांवर विश्वास ठेवत, जनता त्या गोष्टी स्वीकारत गेली. या मार्केटिंग मताशी बहुतांश कंपन्यांनी दूरदर्शन संचाला आपलं लक्ष केलं. दृकश्राव्य माध्यम लोकांच्या पचनी पडतं. एकाच वेळी हजारो घरात उत्पादनांची जाहिरात होते. या सम विचारांनी दोन मालिकेमध्ये येणाऱ्या जाहिराती पुढे दर पाच मिनिटांनी झळकू लागल्या. पुढे जाहिरातींचा भरणा इतका वाढला की, जाहिरात कोणती आणि मालिका कोणती हेच उमगेनासं झालं. आपला टीआरपी वाढवण्याच्या दृष्टीनं दूरदर्शनवर जाहिरातींचे अतोनात स्वागत झालं. त्याचा भडीमार एवढा झाला की, सलग कार्यक्रम बघण्याच्या आपल्या आनंदावर विरजण पडू लागलं.

एकीकडे ही एक बाजू, तर दुसरीकडे जाहिरातींचा अभ्यास करता महाउत्पादनांचा खप वाढवणे या उद्देशपूर्तीचं मालिकांचं प्रायोजकत्व सांभाळून जाहिरातींचा नजराणा पेश केला गेला. यालाही इलाज नव्हता. मग न कंटाळता या जाहिरातींचा आस्वाद घेतला तर मनोरंजन नक्की हे जाणून, या प्रश्नाला पुढे शंका उरली नाही. प्रसंगानुरूप, ऋतूनुसार, जाहिराती दररोज नवं रूप घेऊन आल्या. त्यांचे ही संदेशाचं शास्त्र होतं. यात अतिशयोक्तीचा भाग सोडला तर सामाजिक-वैचारिक संदेशाबरोबर नवीन उत्पादनांची माहिती ही एका मध्यंतराची गरज म्हणून त्याकडे आपण बघू लागलो. यातल्या काही जाहिराती वास्तववादी, थेट भिडणाऱ्या होत्या. कधी कंटाळवाण्या जाहिराती वाजायला लागल्या की, तिथे गॅसवर आदण चढवलं जाऊ लागलं. कुकर लागू लागले. मधल्या वेळात दोन भांडी विसळता, घासता येऊ लागली. अशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने सगळी उत्पादनं तुमच्या दारी आणून जाहिरातीतून ती साकारली. कळत-नकळत योग्य परिणाम साधण्यासाठी दूरदर्शनसारखं प्रभावी माध्यम नाही आणि पुढेही नसेल. म्हणून जाहिरातीसारखा दुसरा ‘नामा’ नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

मनोरंजनातून व्यवहारी जगतातलं ज्ञान अशाप्रकारे मिळत असेल, तर मधल्या वेळेतली कामं उरकता येण्यासाठी तरी जाहिरात “पट” आपल्यासाठी एक मध्यंतरच समजून घ्यायला हवा. बाकी आपण सुज्ञ आहोत सगळे. खरं तर जाहिरात पाहून वस्तू खरेदी करणं ही आपल्या भारतीयांची सवय नाही. असं वेडेपिसे आपण नाही. पण इथं नेत्रसुखाची किमया अगाध मानली तर प्रॉडक्ट उत्पादनामागचं मोहफुलं आपल्याला आवरणार नाही. कदाचित हेच अशा प्रकारच्या जाहिरातनाम्याचे गुपित असावं. म्हणूनच व्यक्तिगणिक, आवडी निवडीनुसार जाहिराती ठरलेल्या असाव्यात प्रत्येकाच्या. कधी बाळाचं हास्य मधाळ खुलवणाऱ्या, तर कधी उत्सुकता ताणून धरणाऱ्या. कधी डोक्यावर केस आणणाऱ्या तर कधी सुपारीच्या कथा सांगत नायकाला दौडायला लावणाऱ्या.

घरातल्या प्रत्येकासाठी यांचं आगमन असावं. जणू वर्षभर चालणारा प्रातिनिधिक आनंदी मेळाचं हा. माझ्या खिशाला परवडणारी डेअरी मिल्क चाॅकलेट कॅडबरीची मी स्वतः चाहती आहे. जिभेवर रेंगाळणारी तिची चव स्वर्गीय आनंद देते. ती जर सिल्कची असेल तर एकट्याने खाण्यातही परमानंद गवसतो. खाण्यासाठी जन्म आपुला खावे अन् फक्त खावे म्हणतंच, कॅडबरीचा फडशा पाडतो मी. प्रेमाचं प्रतीक प्रेमालाच कळावं आणि प्रेमाने खावं. आता यावर अधिक न बोलता मी जाहिरात बघत बघत कॅडबरी खाणचं पसंत करते. एव्हाना लक्षात आलं असेल तुमच्या, जाहिराती अन् त्यांचा बोलबाला अडकवतात आपल्याला कायमचचं. शेवटी ‘चित भी मेरी पट भी मेरी’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -