Saturday, April 26, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सRishi Saxena : ‘काहे दिया परदेस’मुळे ‘मल्हार’ चित्रपट मिळाला

Rishi Saxena : ‘काहे दिया परदेस’मुळे ‘मल्हार’ चित्रपट मिळाला

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

हिंदी भाषिक असूनदेखील मराठी मनोरंजन क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारा अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. त्याचा ‘मल्हार’ चित्रपट नुकताच हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे. ऋषी मूळचा राजस्थानचा, जोधपूरमधील सेंट पॉल शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. शालेय जीवनात त्याला डान्स आवडायचा. राजस्थान युनिव्हर्सिटीमधून त्याने बी. कॉम. केले. त्यावेळी तो क्रिकेट खेळायचा. केवळ क्रिकेट खेळायचा व अभ्यास करायचा. सी. एस. त्याने अर्धवट केलं. त्याला मॉडेलिंग आवडायला लागले. मुंबईमध्ये जाऊन मॉडेलिंग करायला त्याने सुरुवात केली. चार महिन्यांत त्याला मॉडेलिंगचा कंटाळा आला. तो परत राजस्थानला गेला. त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्याने अभिनय करण्याचा निर्णय केला.

मुंबईला आल्यावर त्याने नीरज कबीर यांच्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला. तिथे अभिनयाचे बाळकडू घेतले. ‘यहाँ बंदे सस्ते मिलते है’ या नाटकात त्याने काम केले. हे नाटक पाहून झाल्यावर वडिलांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. त्यानंतर त्याने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. अभिनयाच्या क्षेत्रात त्याचा संघर्ष सुरू होता. त्याच वेळी त्याच्या जीवनाने टर्निंग पॉइंट घेतला. त्याला ‘काहे दिया परदेस’ ही मालिका मिळाली. यामधील त्याची शिव नावाची व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय ठरली होती. त्यामध्ये सायली संजीव, मोहन जोशी, शुभांगी गोखले यांच्याकडून भरपूर गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या. कॅमेऱ्या समोर अभिनय कसा करायचा, हे तो या मालिकेपासून शिकला. त्यानंतर त्याने कलर्स वाहिनीसाठी ‘सलीम अनारकली’ मालिका केली. परंतु ती लवकर बंद झाली. पुढे काय करायचं, हे त्याच्या मनात निश्चित नव्हते, त्याचवेळी त्याला ‘फत्तेशिकस्त’, ‘सुभेदार’ हे चित्रपट मिळाले.

‘काहे दिया परदेस’ मालिकेतील काम पाहून, दिग्दर्शकाने त्याला ‘मल्हार’ या चित्रपटाची ऑफर दिली. आता त्याचा ‘मल्हार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये त्याने लक्ष्मण नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तो शांत प्रवृत्तीचा असतो. त्याच्या घरामध्ये घडामोडी होत असतात, परंतु तो काहीच बोलत नसतो. वेळप्रसंगी त्याला टीकेला देखील सामोरे जावे लागले. त्याच्या पत्नीसोबत काही घडत असते, परंतु हा मात्र शांत असतो. तो सरपंचाचा मुलगा असतो. त्याच्या पत्नीला मुल होत नसतं. तिच्याशी त्याच पटत नाही. शेवटी त्यांच्या नात्यातील दुरावा कसा नष्ट होतो, हे सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी त्याची भूमिकेविषयी खूप चर्चा झाली. त्यानंतर त्याने त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला. या चित्रपटाकडून त्याला भरपूर अपेक्षा आहेत. त्याची एक मराठी वेबसीरिज, रेनबो चित्रपट, संसारा चित्रपट येणार आहे. ऋषीला मल्हार चित्रपटासाठी व त्याच्या आगामी वेबसीरिज व चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -