Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराजतिलकची तयारी

राजतिलकची तयारी

एनडीएच्या संसदीय पक्षाच्या शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिलं आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान यांच्यासह एनडीएच्या सर्व घटकांनी हजेरी लावली होती. रविवारी सायंकाळी देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा यापूर्वी सलग दहा वर्षे नरेंद्र मोदी यांनी सांभाळलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना भरभरून मतदान केले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेल्या एनडीएला भारतीय जनतेने स्पष्ट बहुमत बहाल केले आहे.

निवडणूक लढण्यापूर्वीच एनडीएने पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांचेच नाव पुढे केले होते आणि त्याचमुळे भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांनाच सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी एनडीएला भरभरून मतदान केले आहे. सत्ता मिळण्याची सुतरामही शक्यता नसल्याने व २७२ हा बहुमताचा जादुई आकडाही आवाक्यात नसल्याने इंडिया आघाडीच्या कोणीही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केलेला नाही. यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान होण्यापासून मोदींना कोणताही अडथळा आता शिल्लक राहिलेला नाही. एकट्या भाजपाला लोकसभेच्या जितक्या जागा मिळालेल्या आहेत, तितक्याही जागा इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या खासदारांची जमाबेरीज केली तरी भाजपाच्या संख्याबळाहून कमीच आहे. मोदी हे जवळपास अडीच दशके सत्तेच्या परिघात राहून नेतृत्व करत आहेत. सुरुवातीला गुजरात राज्याचे त्यांनी काही वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले.

गुजरातचा कारभार मोदी सांभाळत असतानाच देशातील जनतेने त्यांना पंतप्रधानपदावरून देशाचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मोदी यांनी सलग दहा वर्षे देशाचे नेतृत्व केल्यावर त्यांच्या कारभारावर खूश असणाऱ्या जनतेने त्यांना पुढील पाच वर्षे देशाचे नेतृत्व करण्याची संधी निवडणूक निकालाच्या माध्यमातून दिलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग तीन वेळा, तब्बल १५ वर्षे देशाचे पंतप्रधानपद सांभाळलेले आहे. आता त्याच राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती रविवारी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर होणार आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत प्राप्त होण्यापासून काही जागा कमी पडल्यावर इंडिया आघाडीतील अतृप्त, असंतुष्ट घटकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा काही काळ जाग्याही झाल्या. त्यातून अफवांना खतपाणीही मिळाले.

इंडिया आघाडीमध्ये दोन आकडी संख्याबळ गाठता न आलेल्या काही कलाकारांना स्वत: किंगमेकर असल्याची स्वप्ने पडू लागली. त्यातून चंद्राबाबू व नितीशकुमारांना फोनाफोनी करण्याचे उद्योगही करण्यात आले. अर्थात त्यातून अंशकालीन राजकीय अफवा निर्माण होऊन चर्चांना खतपाणी मिळाले. काही वृत्तवाहिन्यांनी याचा फायदा उचलत आपला टीआरपीही वाढविण्याचा प्रयत्न केला; परंतु एनडीएतील चंद्राबाबू आणि नितीशकुमार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. इंडिया आघाडीच्या संसदीय नेतेपदी सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची निवड झाली, त्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदावर एक प्रकारे एनडीएतूनच आता शिक्कामोर्तब झाले आहे. एनडीए पंतप्रधानपदाचा चेहरा घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यांत लोकसभा उमेदवारांचा प्रचार करत असताना दुसरीकडे इंडिया आघाडीकडे शेवटपर्यंत पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित झाला नव्हता.

सत्तेच्या परिघात जवळपास अडीच दशके गुजरातचे व त्यानंतर देशाचे नेतृत्व करताना मोदी यांची प्रतिमा कायमच स्वच्छ राहिलेली आहे. कोणत्याही कारणास्तव अथवा कोणत्याही प्रकरणात मोदी यांची प्रतिमा मलीन करणे विरोधकांना शक्य झाले नाही. कारण मोदींनी सुरुवातीला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात व त्यानंतर पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या काळात कोणतेही चुकीचे कार्य न केल्याने देशाच्या जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केल्याचे निवडणूक निकालात मतपेटीतील मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. जगानेही ते पाहिले आहे आणि अनुभवलेही आहे. मोदी कायमच भ्रष्टाचारापासून चार हात लांब राहिले आहेत. खाणार नाही आणि खाऊनही देणार नाही, असा नारा त्यांनी सुरुवातीपासून दिला आहे व त्या नाऱ्याची त्यांनी आजतागायत प्रामाणिकपणे अंमलबजावणीही केलेली आहे. मोदी मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यांनी दहा वर्षांच्या कालावधीत कोणत्याही प्रकाराचा भ्रष्टाचार न केल्याने मोदींचे सरकार हे स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचारविरहीत सरकार भारतातील जनतेने दहा वर्षे अनुभवलेही आहे.

मोदींच्या शपथविधीची भारतातील जनता आता आतुरतेने वाट पाहत आहे. ज्यासाठी मतदान केले, तो हेतू आता मोदींच्या शपथविधीनंतर साध्य होणार आहे. मोदींनी पंतप्रधानपदावरून काम करून दाखविले आणि मगच मतदान मागितले, अशा स्वरूपाचा कारभार केला आहे. चार सौ पारचा नारा हा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक कालावधीत जोश निर्माण करण्यासाठी होता. सलग दहा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात स्थुलता येणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे सर्व विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडी बनविली होती. घटना बदलणार हा अपप्रचार प्रत्येक भारतीयाच्या मनावर बिंबविण्याचा एककलमी कार्यक्रम इंडिया आघाडीकडून युद्धपातळीवर राबविण्यात येत होता. अर्थात या खेळीला भारतीय मतदार काही प्रमाणात भुलले व या अपप्रचाराचे खंडण करण्यात व वस्तुस्थिती सादर करण्यात भाजपासह एनडीएतले सहकारी घटक कमी पडले व त्यातून एनडीएला जागांचा फटका बसला.

भाजपाला स्वबळावर सत्ता मिळविण्याइतपत संख्याबळ मिळाले नाही. उलट त्या अपप्रचारातूनच इंडिया आघाडीचे संख्याबळ वाढले. काँग्रेसला संख्याबळाचे शतक साजरे करता आले. हे होणार असल्याची प्रचिती आल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी उत्साहित करण्यासाठी चारसौ पारचा नारा देण्यात आला. रविवारी होत असलेल्या शपथविधी कार्यक्रमाची देशातील जनता आतुरतेने वाट पाहत आहे. शेजारच्या अनेक देशांतील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रामलल्लाला ज्यांनी अयोध्येत विराजमान केले, तेच मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारणार असल्याने या कलियुगात भारत देशामध्ये त्यांनी आपल्या जनकल्याणकारी कारभारातून रामराज्य आणावे हीच देशातील जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -