नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा रविवार, ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज व मनोरंजन विश्वातील कलाकारांसह आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले. त्यानंतर मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. देशातील अन्य राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण ८००० हजार लोक सोहळ्याला उपस्थित राहाणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
त्यातच मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार, यात काही माजी मंत्री आणि नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. घटक पक्षातील टीडीपी, जेडीयू, आरएलडी, शिवसेना, राष्ट्रवादी, अपना दल, एलजेपी पक्षातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे घटक पक्षांना सोबत घेत भाजपाला सरकार चालवावे लागणार आहे. एनडीएत कोणाला कोणती खाती देणार याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी बैठकही पार पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात भाजपाकडून राजनाथ सिंह, अमित शहा, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, एस जयशंकर, महेश शर्मा, एसपी सिंह बघेल, अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, मनसुख मांडविया, नित्यानंद राय, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, राजीव प्रताप रुडी, शिवराज सिंह चौहान यांची नावे आघाडीवर आहेत. त्याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, वीरेंद्र कुमार खटीक, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, सुरेश गोपी, विप्लब देब, सर्वानंद सोनेवाल, प्रल्हाद जोशी, शोभा करंदजले, पीसी मोहन, नारायण राणे, श्रीपाद नाईक यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
घटक पक्षातील या नेत्यांना संधी
आरएलडी – जयंत चौधरी
एलजेपी – चिराग पासवान
जेडीएस – कुमारस्वामी
टीडीपी – राम मोहन नायडू, के रविंद्र कुमार
एनसीपी – प्रफुल्ल पटेल
आजसू – चंद्र प्रकाश चौधरी
अपना दल सोनेलाल – अनुप्रिया पटेल
जेडीयू – रामनाथ ठाकूर, दिलावर कामत, ललन सिंह
शिवसेना – श्रीकांत शिंदे किंवा प्रतापराव जाधव
टेस्लाच्या म्सक यांच्याकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन
प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला कंपनीचे सीईओ तथा दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच, आपल्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीत आपल्या विजयाबद्दल अभिनंदन. माझ्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक आहेत, असे मस्क यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीपूर्वी, मस्क यांनी भारत दौऱ्यावर येण्याचे ठरवले होते. मात्र, नतंर त्यांनी हा दौरा रद्द केला होता.
नितीशकुमारांना होती पंतप्रधानपदाची ऑफर
सरकार स्थापन करण्यासाठी भाजप विरोधी इंडिया आघाडीनेही प्रयत्न केले होते. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) (जेडीयू)चे प्रमुख नितीश कुमार यांना थेट पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा जनता दल संयुक्त (जेडीयू) चे नेते के. सी. त्यागी यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.