Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम!

Manoj Jarange Patil : परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम!

आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. ज्या गावातून मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभरात पेटला त्या अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावातच जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, याला जुमानता जरांगे उपोषणावर ठाम आहेत, त्यामुळे अंतरवाली सराटीत पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीतच ४ जून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे जरांगेना परवानगी देण्यात आली नाही. यानंतर जरांगेनी आजपासून उपोषण करायचे ठरवले. या उपोषणाला पोलिसांसह अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीही विरोध केला होता. गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे.

सगेसोयरेबाबत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे उपोषण असणार आहे. सरकार आपल्याला फसवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मात्र, यावेळेस त्यांच्या उपोषणाला मराठा समाजाकडूनही थंड प्रतिसाद मिळत आहे. असं असलं तरी अंतरवाली सराटीमध्ये या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने टीन पत्र्याचा शेड तयार करण्यात आला आहे. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा वाढविण्यात आली आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलीय.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक डीवायएसपी, चार पीआय, १४ पीएसआय, एपीआयसह २७५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यात १२० एसआरपीएफचे जवान, २४ दंगा नियंत्रण पथकांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -