फिरता फिरता – मेघना साने
अनेक वर्षे महाराष्ट्र मंडळ लंडन येथे आपला कार्यक्रम व्हावा, अशी इच्छा मी मनात धरून होते. जिद्दीने मंडळाच्या लँड लाईनवर अनेकदा बूथवरून आयएसडी फोन करून, मी मंडळात डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क केला. माझी मुलगी आणि जावई नोकरीनिमित्त युकेमध्ये मिल्टन किन्स येथे राहायला गेले होते. त्यामुळे मला युकेला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यावर मला कळले की महाराष्ट्र मंडळ, लंडन हे लंडनच्या मुख्य भागात नव्हतेच! मिल्टन किन्स या गावातून दोन ट्रेन बदलून, वेम्बली गावात जाऊन तेथून बस करून, डॉलीस हिल लेनला जावे लागणार होते.
गणेशचतुर्थीच्या दिवशी तेथे मंडळातील लोक भेटतील म्हणून मी पंधराशे रुपयांचे ट्रेनचे तिकीट काढून आणि दीड- दोन तासांचा हा प्रवास करून महाराष्ट्र मंडळात गेले. महाराष्ट्र भवन हे बाहेरून चर्चसारखे दिसत होते. कारण ते पूर्वी चर्चच होते. पण आतून मोठा हॉल, स्टेज, मखमली पडदा आणि सगळे वातावरण भारतीय सणासुदीचे होते. गणेशाची मोठी मूर्ती मधोमध ठेवून, एक सभासद पाटावर बसून पूजा करीत होते. भटजी सांगतील तसे मंत्र म्हटले जात होते. जरीच्या साड्या नेसलेल्या स्त्रियांची लगबग सुरू होती. महाराष्ट्रात करतात तशीच अगदी साग्रसंगीत पूजा सुरू होती. मंडळाचे ट्रस्टी कानिटकर, पितांबर नेसून मनोभावे पूजा करीत होते. एवढ्यात त्यांच्या सौभाग्यवती एका पात्रात मोदक घेऊन आल्या. तांब्या -पितळेच्या चकाकत्या भांड्यांच्या शेजारी त्यांनी फुले व प्रसाद ठेवला आणि त्याही पूजेला बसल्या. मी भारतात आहे की युकेमध्ये हे मला स्वतःला चिमटा घेऊन पाहावे लागले.
पूजा संपल्यानंतर श्री. व सौ. कानिटकर यांची ओळख झाली. ते अगदी आपलेपणाने बोलले. महाराष्ट्र मंडळ लंडनशी माझे नाते जोडले गेले. पुढे दोन वर्षांनी पुन्हा युकेला जाण्याचा योग आला तो आम्हाला नातू झाल्यामुळे. मी एका बुधवारी डॉ. देशमुख यांची अपॉइन्टमेन्टला घेतली. सकाळी ११ वाजताची वेळ त्यांनी दिली होती. मिल्टन किन्सहुन वेम्बलीला जाणारी ८.१५ची पहिली गाडी मला पकडावी लागणार होती. त्या दिवशी नातवाला थोडे बरे नव्हते म्हणून माझ्याऐवजी मिस्टर साने देशमुखांना भेटायला कार्यक्रमाची ब्रोशर्स वगैरे घेऊन निघाले. त्यांची पहिली ट्रेन चुकली. त्यामुळे ११ वाजताच्या अपॉइन्टमेन्टला साने ११.२५ला मंडळात पोहोचले. मोबाइल नसल्याने उशीर होत असल्याचे त्यांना कळवताही येत नव्हते. डॉ. देशमुख मंडळात वाट पाहतच होते. साने यांना उशीर झाल्यामुळे, ते जरा नाराज झाले.
“भारतातील मंडळींना दुसऱ्यांना गृहीत धरायची सवय झालेली असते. पण ११ वाजता वेळ दिल्यावर ११.२५ला येणे बरोबर नाही ना? एनी वे, मला ११.३०ला कामासाठी बाहेर जायचे आहे.” असे म्हणून त्यांनी निघायची तयारी केली. मी. साने यांनी त्यांना फक्त माहितीपत्रक दिले. बोलणे काहीच झाले नाही. त्याच्या पुढील बुधवारी मी स्वतःच भेटायला गेले.
पहिली ट्रेन पकडून, ११ वाजेच्या आधीच पोहोचले. डॉ. देशमुखांनी हसतमुखाने स्वागत केले. कार्यक्रमाची माहिती ऐकून घेतली. चहापाणी झाले. डॉ. देशमुख म्हणाले, “या आमच्या मंडळाच्या ज्येष्ठ नागरिक विभागाचीही आज मीटिंग आहे. त्यांच्या अध्यक्षांची ओळख करून देतो.” त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षांशी ओळख करून दिली. अध्यक्षांनी आमच्या कार्यक्रमाची १५ दिवसांनंतरचीच तारीख ठरवली; पण ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून कार्यक्रम सकाळी ११ वाजताचा ठेवला होता. कार्यक्रमाच्या दिवशी मी आणि हेमंत साने १०.४५ला सभागृहात पोहोचलो. दीड तास गारठ्यातून आल्यामुळे चहा आवश्यक होता. पण वेळ कमी असल्याने, मी आधी माझा शर्ट-पॅन्टचा अवतार बदलायला ग्रीनरूममधे गेले. माझी तयारी होते ना होते, तोच दारावर थाप पडली.
“बरोबर ११ वाजता कार्यक्रम सुरू करायचाय. मंडळी खुर्च्यांवर बसलेली आहेत. तुम्ही ताबडतोब कार्यक्रम सुरू करा.” मी बाहेर आले. कोणी तरी मला चहा आणून दिला. पण तो घ्यायला वेळच नव्हता. डॉ. देशमुख आणि मंडळाचे अध्यक्ष व्यासपीठावर गेलेले दिसले. मी पावडरही न लावता, लगेच माईकवर गेले. कथा, कविता, एकपात्री आणि गीते असा ‘कोवळी उन्हे’ कार्यक्रम मी आणि हेमंत साने सादर करत होतो. श्रोतृवृंद चांगलाच रंगला होता. कार्यक्रमाच्या अखेरीस मी लिहिलेल्या आणि हेमंत साने यांनी वेगवेगळ्या रागात बांधलेल्या ओव्या आम्ही ट्रॅकवर सादर केल्या. कार्यक्रमानंतर मंडळाच्या अध्यक्षांनी मला बाजूला नेऊन एक पाकीट दिले. “मानधन तर ठरलेच नव्हते.” पाकीट पाहून मी आश्चर्याने म्हणाले.
“हे मानधन नाही. हे पौंड्स तुम्हाला बक्षीस म्हणून एका सभासदाने दिले आहेत. पण नाव जाहीर करायला मनाई केली आहे.” “बरं, धन्यवाद.” असे म्हणून आम्ही सभागृहातून बाहेर पडलो, तेव्हा एक वयस्कर बाई आमच्याकडे आली आणि म्हणाली, “आज तुम्हा पती पत्नीचा कार्यक्रम बघून मला जगावेसे वाटले.” “म्हणजे?” आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. तशी ती म्हणाली, “गेले अनेक महिने माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. मी चित्रपट पाहिले, टीव्ही मालिका पाहिल्या, पुस्तके वाचली, मैत्रिणींबरोबर पार्टीला गेले. पण काही केल्या ते विचार माझ्या मनातून जात नव्हते. आज तुमचा हा कार्यक्रम पाहून मन उल्हसित झाले आणि नकारात्मक विचार दूर झाले.” धन्यवाद देऊन ती महिला निघून गेली. ते पाकीट तिनेच दिले असणार, याची आम्हाला खात्री झाली. डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत आम्ही निघालो.