Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखहिंदू साम्राज्याचा सूर्य महाराणा प्रताप

हिंदू साम्राज्याचा सूर्य महाराणा प्रताप

लता गुठे

नुकतीच राजस्थान येथील उदयपूर, जयपूरला जाऊन आले. तेथे मोठमोठे राजवाडे पाहून राज घराण्याच्या शान-शौकतचा अंदाज येतो. अनेक ठिकाणी असलेले प्रदर्शन आणि त्या प्रदर्शनात ठेवलेल्या राजघराण्यातील गाड्या, वस्तू, हत्यारे, पालख्या, रेशमी वस्त्र, राजघराण्यातील स्त्रियांचे अलंकार आणि जागोजागी उभे असलेले ऐटबाज पुतळे पाहून राजघराण्यातील राजांचा थाटमाट लक्षात येतो. पर्यटकांच्या आकर्षणांमध्ये अल्बर्ट हॉल संग्रहालय, हवा महल, जल महल, सिटी पॅलेस, आमेर किल्ला, जंतर-मंतर, नाहरगड किल्ला, जयगड किल्ला हे सर्व पाहताना येथील राजघराणे, राजे महाराजे यांच्यासह त्यांच्या राहण्याविषयी बरीच माहिती मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षणाने मलाही भुरळ घातली.

उदयपूर येथील एका प्रदर्शनामध्ये हल्दीघाटीतील अनेक प्रसंग रेखाटले होते. महाराणा प्रताप व त्यांचे फोटो पाहून पाय जाग्यावर खिळले. महाराजा प्रताप सिंग यांचा घोड्यावर बसलेला रुबाबातील फोटो पाहिला आणि त्यांच्या चेतक घोड्याची कहाणी आठवली. युरोपला गेल्यानंतर ऑस्ट्रिया येथील जगातील सर्वात मोठे असलेले सॉरस्की क्रिस्टल वर्ल्डमध्ये चेतक घोड्याची प्रतिकृती पाहिली आणि पाहतच राहिले. ती प्रतिकृती सर्वसामान्य घोड्याची नव्हती, तर महाराणा प्रताप यांच्या सर्वश्रेष्ठ घोड्याची होती ही जाणीव अधोरेखित झाली आणि महाराणा प्रताप यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.

मेवाड येथील राजे महाराणा प्रताप हे अतिशय शूर पराक्रमी होते. म्हणूनच हिंदू साम्राज्याचा सूर्य असा त्यांचा उल्लेख केला जात असे. त्या महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी सिसोदिया घराण्यात राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्यावर झाला.
उदयपूरचे राजा उदयसिंग हे महाराणा प्रताप यांचे वडील होते. त्यांच्या आईचे नाव जयवंत कंवर होते. अतिशय पराक्रमी पूर्वजांच्या घरात जन्मलेले महाराणा प्रतापही अतिशय पराक्रमी निघाले आणि घराण्याचा वारसा त्यांनी पुढे चालविला. महाराणा प्रताप हे राणा संगा यांचे नातू होते.

महाराणा प्रताप यांना लहानपणापासूनच राजवाड्यापेक्षा सामान्य जनतेबरोबर वेळ घालायला जास्त आवडत असे. त्यांच्या जनतेमध्ये भिल्ल समुदाय जास्त प्रमाणात होता. त्यामुळे अर्थातच त्यांच्या सवंगड्यांमध्येही भिल्ल मुले जास्त होती. त्यांनी स्वतःबरोबरच आपल्या सवंगड्यांनाही सशस्त्र युद्धाचे धडे दिले. भिल्ल आपल्या मुलाला किका असे संबोधतात. म्हणून ज्येष्ठ भिल्ल, महाराणा यांना किका नावाने हाक मारत असत. यावरून महाराणा यांच्याबद्दल सामान्य लोकांच्या मनात किती आदर आणि प्रेम होते हे लक्षात येते. लहानपणापासूनच त्यांनी युद्धनीतीचे शिक्षण घेतले होते. उदयसिंह आणि मेवाड राज्य असुरक्षिततेने घेरले होते. तसेच कुंभलगडही सुरक्षित नव्हते.  त्या काळात  जोधपूरचा राजा मालदेव सर्वात शक्तिशाली होता. त्यांच्या पराक्रमाच्या चर्चा दूरवर पोहोचल्या होत्या.

महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंग यांनी मेवाडची राजधानी उदयपूर स्थापन केली होती. त्यांनी १५६८ ते १५९५ पर्यंत राज्य केले. उदयपूरवर यवन आणि तुर्कांकडून सहज हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेऊन महाराणा प्रताप यांनी उदयपूर सोडले आणि कुंभलगड आणि गोगुंडा या डोंगराळ भागात आपले राजघराणे स्थापन केले. त्या वेळी महाराणा प्रताप सिंह यांनी मेवाडची गादी सांभाळली. त्या काळात आजूबाजूला मुस्लीम सत्तेचा जोर असल्यामुळे राजपुतांना अतिशय नाजूक टप्प्यातून जावे लागत होते. राजपुतांच्या अनेक राजांनी सम्राट अकबराच्या क्रौर्यापुढे हार मानली. अनेक वीर राजघराण्यांच्या वारसांनी मुघल घराण्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केले आणि आपली प्रतिष्ठा धुळीला मिळविली. काही स्वाभिमानी राजघराण्यांसोबत महाराणा प्रताप यांनी देखील आपल्या पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी शपथ घेतली होती. म्हणूनच ते अकबराच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत.

अनेकदा अकबराने शांतिदूत पाठवले; परंतु महाराणा प्रताप यांनी ते धुडकावून लावले, त्यामुळे दिल्लीचा अकबर बादशहा आणि महाराणा प्रताप यांच्यात ३० मे १५७६ रोजी सकाळी हल्दी घाटीच्या मैदानात घनघोर युद्ध झाले. त्या युद्धामध्ये चेतक घोड्याने महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले. महाराणा प्रताप युद्धावर जाताना ७२ किलो वजनाचे चिलखत घालायचे आणि हातात ८१ किलोचा भाला धरायचे. भाले, चिलखत, ढाल-तलवार यांचे एकूण वजन २०८ किलो होते. महाराणा प्रताप जेव्हा २०८ किलो वजन घेऊन रणांगणात उतरायचे तेव्हा त्यांची शक्ती काय असेल, याचा विचार करण्यासारखे आहे. हे सर्व घेऊन वाऱ्याच्या वेगाने धावायचा तो चेतक आणि महाराणा प्रतापही चेतकच्या विश्वासावर अनेक लढाया जिंकले.

हल्दीघाटीच्या युद्धात, अभूतपूर्व शौर्य आणि धैर्याने, महाराणा प्रताप यांनी अकबराच्या शेकडो सैनिकांना ठार केले. जेव्हा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली. प्रचंड सैन्यासमोर संपूर्ण पराक्रम व्यर्थ ठरला. महाराणा प्रताप यांच्या अंगावर तलवारीचे प्रचंड वार झाले होते. चेतकच्या पायाला लागल्यामुळे महाराणा प्रताप आणि चेतक प्रचंड घायाळ झाले होते. त्यामुळे ते युद्ध करण्याच्या स्थितीत नव्हते. म्हणून त्यांच्या सरदारांनी हिंदुस्थानाचा स्वामी जिवंत राहावा, भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले, तरच अत्याचारी मुघल आपल्या भूमीत पाय रोवू शकणार नाहीत. असे म्हणून सर्व सरदारांनी जबरदस्तीने महाराणा प्रतापांना हात जोडून साकडे घातले की, “राणाजी, आज जर तुम्ही या युद्धातून सुखरूप गेला नाहीत, तर आम्ही न लढताच आमचा शिरच्छेद करून घेऊ. सरदारांची विनंती मान्य केली. सरदार मानसिंग यांनी महाराणा प्रताप यांचा मुकुट आणि छत्र डोक्यावर ठेवले. मुघलांनी त्यांना महाराणा प्रताप समजले आणि त्यांच्या मागे धावले. त्या संधीचा फायदा घेऊन महाराणा प्रताप युद्धक्षेत्रातून पळाले. त्या लढाईमध्ये राजपुतांनी मोगलांशी शौर्याने मुकाबला केला.

रणांगणावर उपस्थित असलेल्या २२ हजार राजपूत सैनिकांपैकी केवळ ८ हजार जिवंत सैनिक रणांगणातून कसेबसे निसटू शकले. महाराणा प्रताप यांनी हल्दी घाटीच्या लढाईनंतरचा काळ जंगलात घालवला. त्यांनी गनिमी युद्ध धोरणाने अकबराचा अनेक वेळा पराभव केला. महाराणा प्रताप चित्तोड सोडून जंगलात राहू लागले. राणी, सुकुमार राजकुमारी आणि कुमार यांना कसे तरी भाजी-भाकरीवर आणि जंगलातील डबक्यांच्या पाण्यावर जगावे लागले. अरावलीच्या गुहा त्यांचे निवासस्थान होते आणि उघडा खडक हे त्यांचे अंथरूण होते. महाराणा प्रताप यांना त्यांच्या कुटुंबाची आणि लहान मुलांची काळजी वाटत होती. आजूबाजूच्या अनेक लहान राजांनी महाराणा प्रताप यांना त्यांच्या राज्यात राहण्याची विनंती केली; परंतु मेवाडची भूमी मुघलांच्या वर्चस्वापासून वाचवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती की, जोपर्यंत मेवाड मुक्त होत नाही तोपर्यंत ते राजवाडे सोडून जंगलात राहतील. स्वादिष्ट अन्नाचा त्याग करून कंदमुळं आणि फळांनी पोट भरतील; परंतु अकबराची सत्ता कधीही स्वीकारणार नाहीत.

उघड्या रानावनात, जंगलात राहणारे भिल्ल त्यांचे सामर्थ्य हे महाराणा प्रताप यांना माहीत होते. भिल्लांचे सामर्थ्य ओळखून महाराणा प्रताप यांनी जंगलात राहून गनिमी युद्ध पद्धतीने मुघल सैन्याला अनेक वेळा अडचणीत आणले होते. आपली साधने मर्यादित असतानाही महाराणा प्रताप यांनी शत्रूसमोर आपले डोके झुकवले नाही. मेवाडच्या भामाशहा यांनी आपली सर्व संपत्ती महाराणांच्या चरणी लावली. भामाशाहने महाराणांना २० लाख अशरफियां आणि २५ लाख रुपये भेट दिले. या विपुल संपत्तीसह महाराणा पुन्हा लष्करी संघटनेत सामील झाले. महाराणा यांनी आपल्या लष्करी दलाची पुनर्रचना केली आणि त्यांच्या सैन्यात नवीन जीवन संचारले. महाराणा यांनी कुंभलगडावर आपला ताबा पुन्हा प्रस्थापित करताना, अकबर बादशहाच्या सैन्याने स्थापन केलेल्या ठाण्यांवर आणि तळांवर हल्ले चालू ठेवले. अकबराच्या सैन्याची लूट केली. महाराणा प्रतापांनी प्रचंड सैन्याशी लढत चित्तोड वगळता आपले सर्व किल्ले शत्रूपासून परत मिळवले. त्यांनी उदयपूरला आपली राजधानी पुन्हा स्थापित केली. विचलित झालेल्या मुघलीया सैन्याचा कमी होत चाललेला प्रभाव आणि त्याच्या आत्मशक्तीमुळे, महाराणा यांनी चित्तौडगड आणि मांडलगड व्यतिरिक्त संपूर्ण मेवाडवर आपले राज्य पुन्हा स्थापित केले.

अखेरीस चावंड येथे १५९७ मध्ये युद्धात झालेली शारीरिक आणि शिकारीमुळे झालेल्या जखमा यामुळे महाराणा प्रताप मरण पावले. महाराणा प्रताप वारल्यानंतर त्यांच्या चितेमध्ये त्यांच्या आवडत्या लाडक्या चेतक घोड्यानेही उडी घेतली असे म्हणतात. ३० वर्षांचा संघर्ष आणि युद्धानंतरही अकबर कधीही महाराणा प्रतापांना कैदी बनवू शकला नाही आणि त्यांना वाकवू देखील शकला नाही. आपला देश, जात, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारे आणि अखंड लढत राहणारे महान योद्धा महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने आदरपूर्वक अभिवादन.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -