जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांचा दावा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एनडीएने (NDA) २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले, परंतु एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३२ जागांसह चांगली कामगिरी केली. त्यामुळे देशात एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडीचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि जेडीयूचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांची यामध्ये किंगमेकरची भूमिका होती. मात्र, दोघांनीही भाजपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर जेडीयूचे नेते के. सी. त्यागी (K. C. Tyagi) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती मात्र जेडीयूने (JDU) ती फेटाळली, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला आहे.
केसी त्यागी म्हणाले की, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमारांना ऑफर दिली. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांना संयोजक केलं नाही. पण आज तेच लोक पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने एनडीएमध्ये आहोत, अशी के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं.
नितीश कुमार काय म्हणाले?
नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू. जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.
इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.