Thursday, September 18, 2025

पुण्यात मुसळधार पाऊस

पुण्यात मुसळधार पाऊस

धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात नागरिकांचे नुकसान

पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर, शनिवारी पुणे , रायगड, सांगली, बेळगाव, गोंदिया जिल्ह्यासंह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येते.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. शहर आणि परिसरात सध्या आभाळ भरुन आले असून पुण्याच्या उत्तर-पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सर्वत्र अंधारुन आले असून जवळजवळ तीन ते चार तास पाऊस चांगलाच बरसत होता. त्यामुळे दिवसभर काहीसा उकाडा जाणवत होता, पण आता पावसाने हजेरी लावल्याने हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे.

पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. ११ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते.

पुणे शहरातील पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तसेच वारजे माळवाडी, कोथरुड या भागांसह घोरपडी, लोहगाव इथे पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याचबरोबर सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धायरी फाट्यापासून पुण्याच्या दिशेला मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यंदाच्या पावसाने नागरिकांचे नुकसान होणार नाही आणि रस्ते तुंबणार नाही, याची काळजी घेणार असून यासंदर्भात लवकरच प्रशासनाची बैठक घेणार असल्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. खासदार होताच पहिल्याच दिवशी पुण्यातील पावसावर मोहोळ यांनी आश्वासन दिले आहे. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment