Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : केवळ तीन नव्हे तर 'त्या' चौथ्या पक्षामुळे झाला महायुतीचा...

Devendra Fadnavis : केवळ तीन नव्हे तर ‘त्या’ चौथ्या पक्षामुळे झाला महायुतीचा पराभव!

उद्धव ठाकरेंना मराठी माणसाने नाही, तर एका विशिष्ट समाजाने मतं दिली

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली महायुती मागे पडण्याची कारणे

मुंबई : राज्यात महायुतीला (Mahayuti) आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारमधून मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या राजीनाम्याबाबत अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. तत्पूर्वी मुंबईत भाजपची बैठक पार पडली, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘तीन नव्हे तर आणखी एका चौथ्या पक्षामुळे महायुतीचा पराभव झाला’, असं वक्तव्य केलं. त्यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत महायुतीच्या पराभवाची नेमकी कारणं सांगितली.

राज्यातल्या निकालाची आकडेवारी स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मतं ४३.९ टक्के आहेत आणि महायुतीला मिळालेली मतं ४३.६ टक्के आहेत. पॉईंट थ्री पर्सेट इतकी मतांमधली गॅप आहे. परंतु तिकडे ३१ आणि इकडे १७ जागा आहेत. मविआला २ कोटी ५० लाख मतं आहेत. आपल्याला २ कोटी ४८ लाख मतं आहेत. केवळ दोन लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळालेली आहेत. मुंबईचा विचार केला तर त्यांना २४ लाख आणि आपल्याला २६ लाख मतं आहेत. दोन लाख मतं आपल्याला जास्त आहेत. परंतु त्यांना चार आणि आपल्याला दोन जागा मिळाल्या आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले की, आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो तर आपण चौथ्या पक्षाशीदेखील लढत होतो, तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं की, या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या हे लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरीता काम करत आहे, त्याला आपण रोखू शकलो नाहीत.

‘तो’ चौथा पक्ष कोण?

आपली लढाई ही तीन पक्षांविरोधात नव्हती, त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हविरोधात होती, त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो. संविधान बदलणार, हा विषय इतका खालपर्यंत गेला. पण त्या मानाने आपण त्या प्रचाराला इफेक्टिव्हली काऊंटर करु शकलो नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा चौथा टप्पा आला होता. त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात २४ जागांपैकी केवळ चार जागा आपण जिंकू शकलो. आपल्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या २४ जागांमध्ये निवडून आलेल्या आहेत, असं म्हणत फडणवीसांनी कार्यकर्त्याचं मनोबल वाढवलं.

उद्धव ठाकरेंची मतं मराठी माणसाची नाही, तर विशिष्ट समाजाची

उद्धव ठाकरेंना मुंबईत मराठी माणसाने मतदान केलं नाही, त्यांना विशिष्ट समाजाने मतदान केलं असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती तर कोकणात का दिसली नाही? कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही. पालघर, रत्नागिरी, ठाण्यात त्यांना एकही जागा नाही. यांना मुंबईत कुणामुळे जागा मिळाल्या हे सर्वांना माहिती आहे. यांना मुंबईत मराठी माणसांनी मतदान केले नाही, तर विशिष्ट समाजाच्या मतांवर यांनी निवडणूक जिंकली. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात देखील त्यांना जास्त लीड घेता आले नाही.

मराठ्यांना सर्वकाही देऊनही मतं विरोधकांच्या पारड्यात गेली

मराठवाड्याच्या निकालाचं मला आश्चर्य वाटलं असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजामध्ये विरोधी पक्षाकडून नॅरेटिव्ह तयार केला गेला. मराठा समाजाला दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं. सारथी संस्था, फी सवलत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामडंळ, हॉस्टेल योजना या सगळ्या गोष्टी आपल्या काळात झाल्या. असं असलं तरीही ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणला विरोध केला, त्यांच्याच पारड्यात हे मतदान गेलं. पण हे नॅरेटिव्ह जास्त काळ टिकणार नाही, हा बुद्धिभेद टिकणार नाही. नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला, तो काही प्रमाणात यशस्वी झाला. पण मोठ्या प्रमाणात झाला नाही. असं झालं असतं तर भाजपला ४४ टक्के मतं मिळाली नसती. २०१९ च्या मतांशी आपण तुलना केली आपली प्रत्यक्षात मतं वाढली. टक्केवारीचा विचार केला तर एका टक्क्याने मतं कमी झाली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -