Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सDeepak Karanjikar : ती ‘अथांग’ बारा मिनिटे...!

Deepak Karanjikar : ती ‘अथांग’ बारा मिनिटे…!

राजरंग – राज चिंचणकर

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, वक्ता, विचारवंत ही आणि अशी अनेकविध वैशिष्ट्ये ज्यांच्या ठायी एकवटली आहेत; असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दीपक करंजीकर. जितक्या तन्मयतेने ते रंगमंचावर भूमिका साकारतात; तितक्याच तरलतेने त्यांची लेखणीही कागदावर उमटते. ‘घातसूत्र’कार अशी एक वैशिट्यपूर्ण ओळख दीपक करंजीकर यांना आता मिळाली आहे. परराष्ट्र खात्याच्या फायनान्स अँड प्रोग्रॅम कमिटीचे (आय. सी. सी. आर.) चेअरमन, सांस्कृतिक खात्याच्या नॅशनल कल्चरल मॅपिंग मिशनचे चेअरमन या आणि अशा राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या खात्यांमध्येही त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. विविध प्रकारचे आणि विविध क्षेत्रांतले अनुभव त्यांनी गाठीशी बांधले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी खास या सदरासाठी एक अनुभव शेअर केला आहे. जो निव्वळ थरारक आहे.

परदेशातल्या पहिल्या नोकरीसाठी दीपक करंजीकर ऑस्ट्रेलियात गेले होते. तिथे कॉमनवेल्थ देशांचा एक प्रोजेक्ट होता आणि त्यावर ते लीड म्हणून काम करत होते. तो प्रोजेक्ट संपल्यावर, एका ट्रेनिंगसाठी ते तिथे थांबले. हे ट्रेनिंग टास्मानियाला होते. ऑस्ट्रेलियाच्या जवळ असलेल्या या टास्मानिया बेटाकडे जाताना प्रवासात ‘बास स्ट्रीट’ नावाची एक खाडी म्हणजे सामुद्रधुनी लागते. दीपक करंजीकर त्यांच्या सोबतच्या मंडळींसह एका यॉटमधून तिथे जाण्यास निघाले.
हा अनुभव कथन करताना दीपक करंजीकर सांगतात, “त्या यॉटमधले लोक आतल्या भागात बसून नाश्ता वगैरे करत होते. मी बाहेर उभा होतो. माझ्या एका मित्राने सांगितले, ‘आता आपण जात असलेल्या बास स्ट्रीटमध्ये अतिशय अनप्रेडिक्टेबल वेदर असते. कधी इथे शांतता असते, तर कधी इथे समुद्र उसळतो. त्यामुळे तू आतमध्ये येऊन बस.’ मी त्या यॉटच्या बाहेरच्या बाजूच्या दांडीला, जी काऊंटर असतात, त्याला हात पकडून, बोटीकडे पाठ करून, अतिशय काचेसारख्या दिसणाऱ्या त्या समुद्राकडे मी पाहत होतो. वास्तविक त्या क्षणी वातावरण अतिशय स्टेबल होते. पण काही वेळातच, वादळाची शक्यता असल्याची घोषणा यॉटवरून केली गेली आणि त्याचबरोबर, सर्वांना सुरक्षित जागेवर जाण्याची सूचना करण्यात आली.

ती घोषणा सुरू असतानाच, यॉटवर पहिली लाट येऊन धडकली आणि पुढच्या साधारण बारा मिनिटांत मी किमान शंभर ते सव्वाशे उठाबशा काढल्या. घट्ट पकडून ठेवलेले हात सोडायची माझी हिंमत नव्हती आणि माझे पाय स्थिर नव्हते. ती यॉट ३० ते ४० डिग्री खालीवर होत होती आणि प्रत्येक वेळेला मी उठाबशा काढत होतो. माझ्या हाती काहीच नव्हते, मी नैसर्गिकरीत्या खाली-वर होत होतो. माझे पाय भरून आले होते. मला कळेना की हा इतका स्वस्थ, शांत असलेला समुद्र, अचानक इतका उसळला कसा? मला त्या जागेवरून अजिबात हलता येत नव्हते. पाण्याचे सपकारे येत होते, मात्र मी तिथून हललो असतो; तर थेट समुद्रात फेकला गेलो असतो. पण अचानक पुढच्या दहा मिनिटांत एकदम सर्व काही शांत झाले. त्या यॉटच्या शेवटच्या कॉर्नरवरून गळणारे पाण्याचे काही थेंब सोडले, ओला झालेला डेस्क सोडला, ओला झालेला मी सोडलो; तर जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने समुद्र पुन्हा शांत झाला.

या वादळी अनुभवाने दीपक करंजीकर यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याबाबत ते म्हणतात की, “मला त्या घटनेने दोन गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही वळणावर कधी काय वाढून ठेवले असेल, ते सांगता येत नाही. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, एखादी घटना घडून गेल्यानंतर पुन्हा सर्व पूर्ववत होत असते. त्यामुळे त्या घटनेत अडकून कधी पडू नये. वर्तमानकाळात जगणे, भूतकाळाच्या फार आठवणी न काढणे आणि पुढे काय होईल याचा फार विचार न करता, वर्तमानकाळात आनंदाने जगणे, हे आयुष्याचे इंगित मला त्या प्रवासात कळले. केवळ त्या क्षणाकरिता किंवा त्या क्षणाची जाणीव करून देण्याकरिता ती ट्रीप होती का, असा विचार नंतर माझ्या मनात आला. मात्र त्या ट्रीपने, त्या यॉटने, त्या समुद्राने, त्या वादळाने, त्या शांततेने मला जे काही दिले, ते माझ्या आयुष्यात मला फार कमी वेळा मिळाले आहे आणि मला त्याबद्दल फार कृतज्ञता आहे. शेवटी असे असते की, उपकार कोण करतो, ते नेहमी कळत नाही, त्यामुळे आपण त्या-त्या क्षणांशी कृतज्ञ असावे. त्या अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासाशी मी अत्यंत कृतज्ञ आहे. प्रवासातल्या त्या बारा मिनिटांनी मला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -