Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीभाववाढीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांचा चाळीतच सडतोय कांदा

भाववाढीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांचा चाळीतच सडतोय कांदा

निवडणुकीनंतरही भाव स्थिर असल्याचा बसतोय फटका

मालेगाव : लोकसभा निवडणुकीत खानदेशसह उत्तर महाराष्ट्रात प्रचाराच्या अग्रभागी असलेल्या कांद्याने सत्तारुढ पक्षाला चांगलेच रडविले. निवडणुकीनंतरही कांद्याचे भाव स्थिर आहेत. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा भरुन ठेवला आहे. तालुक्यासह कसमादेत या वर्षी कडक उन्हाचा तडाखा जाणवला. भाववाढीच्या प्रतिक्षेत असतांनाच चाळींमध्येच कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे.

खानदेशमध्ये लाखो क्विंटल कांदा चाळींमध्ये शिल्लक आहे. भाव जैसे थे असून, उन्हाची तीव्रता असणाऱ्या भागात कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे. गेल्या वर्षी तालुक्यासह कसमादे परिसरात दुष्काळी परिस्थिती होती. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत कांद्याला चांगला भाव मिळाला होता. दिवाळीनंतर येथील बाजारात ४ हजार ३०० रुपयापर्यंत भाव गेला होता.

कांद्याला मिळत असलेला भाव पाहून त्यावेळी शेतकऱ्यांनी बाजरी, मका ही खरीपाची अर्धवट पिके काढून टाकत लेट खरीपात पावसाळी लाल कांद्याची लागवड केली होती. तसेच, उन्हाळी कांद्याच्या लागवडीची धूम सुरु असतानाच केंद्र शासनाने ८ डिसेंबरला २०२३ ला निर्यातबंदी लागू केली. तेव्हापासून कांद्याचे भाव कोसळले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांचा तीव्र रोष पाहता कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात आली. केवळ दोन दिवस कांद्याला अडीच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. महिन्यापासून अत्यंत कमी कांद्याला दोन हजाराच्या आसपास भाव मिळत आहे. सरासरी बाजारभाव १५०० रुपयाच्या आत-बाहेर आहे. कसमादेतील कांदा दर्जेदार आहे. यावर्षी वातावरण अनुकुल असल्याने कांद्याचे चांगले उत्पन्न झाले आहे.

पन्नास टक्क्यांहून अधिक कांदा शिल्लक

चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा राखून ठेवला आहे. शहरासह कसमादे परिसरात गेल्या साडेतीन महिन्यापासून कडक ऊन पडत आहे. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील पारा ४० अंशापर्यंत आहे. कडक उन्हामुळे काही ठिकाणी कांदा चाळींमध्येच सडू लागला आहे. देशांतर्गत कांद्याचे उत्पन्न घटल्याने आगामी काळात भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत कांदा सडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कांदा सडण्याच्या भीतीने काही ठिकाणी शेतकरी मिळेल त्या भावात मालाची विक्री करीत आहेत. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी चांगल्या वातावरणामुळे उन्हाळी कांद्याचे गेल्या वर्षाएवढेच उत्पादन झाले आहे. जाणकारांच्या मते अजूनही ५० टक्क्यापेक्षा अधिक कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.

कांद्यावरच दुष्काळींची अर्थव्यवस्था अवलंबून

अपेक्षित भाव मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक देखील कमी झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत कांदा या एकमेव पिकावरच शेतीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. राखून ठेवलेल्या कांद्याला भविष्यात चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -