एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यावर नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच घटक पक्षांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी मोदींनी घटकपक्षांचे आभार मानले. तर त्यांनी इंडिया आघाडीवर तुफान हल्लाबोल केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता ज्याला सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी पुढच्या १० वर्षात आपला अजेंडा काय असणार, ते सांगितले.
देशाच्या इतिहासात एवढी सक्षम आघाडी यापूर्वी कधीची झाली नव्हती. देश चालवायचा असेल तर सर्वांची सहमत आवश्यक असते. आता देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांचे मत विचारात घेऊन काम करणार आहोत. एनडीएला तीन दशके झाली आहेत. मागच्या दहा वर्षात आम्ही एनडीएला सोबत घेऊन मोठे काम उभे केले आहे. हे जे एनडीएचे लोक आहेत, त्यांनी देशाला उत्तम प्रशासन दिले आहे. येत्या १० वर्षात देशाला वेगाने विकासाच्या मार्गावर नेऊ. आमच्या सगळ्यांचा केंद्रबिंदू हा गरीबांचे कल्याण असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. निवडणुक काळात विरोधक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिले आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान यांच्यासह एनडीएच्या सर्व घटकांनी हजेरी लावली होती.
४ जूनला जेव्हा निकाल येत होते, त्यावेळी मी व्यस्त होतो. मग मला फोन येऊ लागले. मी कोणाला तरी विचारले की आकडे ठीक आहेत, पण ईव्हीएम ठीक आहेत का ते सांगा. हे लोक (विरोधक) भारतातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न करत होते. हे लोक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते. मला वाटले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक ईव्हीएमचा बिअर काढतील. मात्र ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील ५ वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडी सातत्याने एनडीए..एनडीए.. असे शब्द होते आणि कायम सोबत राहण्याचे बोलत होते. मोदी म्हणाले की, एनडीएच्या नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये परिश्रम घेतले, त्यांचे खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. सद्य घडीला २२ राज्यांमध्ये एनडीएला सेवा करण्याची संधी जनतेने दिली आहे.
मोदींमुळे देशाची जगात शान वाढली : चंद्राबाबू
गेल्या १० वर्षांत भारतात मोठा बदल झाला असून भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच सुरू राहील आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत यावेळी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नरेंद्र मोदीं नेतृत्वाखाली एनडीए सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश जागतिक शक्तीस्थान बनला आहे. मी गेली चार दशके राजकारणात आहे. आज संपूर्ण जगात देशाची शान वाढली आहे, त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना जाते. आज भारताकडे मोदीजींच्या रुपाने योग्य वेळी योग्य नेता आला आहे. येत्या काही दिवसात भारत जागतिक पातळीवर आघाडीवर असेल. एनडीएच्या संसदीय पक्षाचा नेता म्हणून मोदींच्या नावाला माझा पाठिंबा आहे.”
विरोधक सर्वच पराभूत होतील : नितीशकुमार
जेडीयूचा पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा आहे. आमचा पक्ष पूर्ण ५ वर्षे नरेंद्र मोदी यांच्यासोबत असेल. पुढच्या वेळी आपण जास्त बहुमत घेऊन येऊ. आज हा आनंदाचा क्षण आहे. दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी सगळ्या देशाची सेवा केली आहे. आता पूर्ण विश्वास आहे की, राज्यांचे जे काही बाकी आहे ते पूर्ण करतील. आम्हाला तर वाटतंय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळेच पराभूत होतील. आम्ही सगळे तुमच्या नेतृत्वात काम करू, असे नितीश कुमार म्हणाले.
शिवसेना-भाजपा युती फेविकॉलचा जोड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मी शिवसेनेबद्दल इतके सांगेन की, भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात आमची युती झाली होती. त्यामुळे ही युती फेविकॉलचा जोड आहे, कधीच तुटणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जुन्या संसद भवनात एनडीच्या बैठकीत शुक्रवारी राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना नेतेपदी निवडण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावावेळी टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एकनाथ शिंदे, चिराग पासवान, पवन कल्याण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी माझा पक्ष शिवसेनेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी या देशाचा विकास केला, देशाला पुढे नेले, जगात देशाचे नाव चमकावले, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करुन नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळेच खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना देशातील जनतेले नाकारले आणि तिसऱ्यांदा मोदींना स्वीकारले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत केली. त्यामुळेच देशाने सलग तिसऱ्यांदा त्यांची जादू पाहिली आहे. मी पंतप्रधानांसाठी एक कविता सादर करतो. ‘मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खिंचा है. मैं पत्थर पे लिखी इबारत हु , शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे’, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.