Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीPatole Vs Raut : पटोले म्हणतात 'काँग्रेस मोठा भाऊ', तर राऊत म्हणतात...

Patole Vs Raut : पटोले म्हणतात ‘काँग्रेस मोठा भाऊ’, तर राऊत म्हणतात ‘जो जिंकेल त्याची जागा’!

निकालानंतर मविआची खरे रंग दाखवण्यास सुरुवात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली तर महायुतीला (Mahayuti) मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्यात मविआमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘काँग्रेस मोठा भाऊ ठरला’ असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य मविआचाच घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या संजय राऊतांना (Sanjay Raut) पचलं नाही. त्यांनी या वक्तव्यावर ‘कोणीही लहान मोठं नाही, जो जिंकेल त्याची जागा’, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता निकाल हाती आल्यावर मविआचे खरे रंग आणि अंतर्गत धुसफूस बाहेर यायला लागल्याचे चित्र आहे.

मविआच्या जागावाटपात सर्वाधिक जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या होत्या. ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या, मात्र केवळ ९ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. तर काँग्रेसने १७ जागा लढवल्या आणि १३ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले म्हणाले होते की, “आम्ही लोकसभा निवडणुकीतदेखील मोठ्या भावाची भूमिका निभावली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याबरोबर असलेले आधी गट होते आता पक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता, तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आजही निभावत आहोत. मात्र, लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला होता.

यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, “कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाही. महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला आहे. लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्या आहेत. काँग्रेससमोर तसं संकट नव्हतं. त्यांचं चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होतं. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असं ठरलं आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि शिवसेनेसमोर असलेल्या आव्हानांची तुलना केल्याने तसेच महाविकास आघाडीचा विधानसभेचा फॉर्म्युल्याबाबत सांगताना जी जागा जो जिंकेल, ती त्याची असं म्हटल्याने संजय राऊतांनी मविआतील वाद सर्वांसमोर आणल्याचे चित्र आहे. येत्या काळात मविआमध्ये आणखी धुसफूस होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -