Monday, October 20, 2025
Happy Diwali

‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेने गाठला प्रवासी संख्येचा दहा कोटींचा पल्ला

‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेने गाठला प्रवासी संख्येचा दहा कोटींचा पल्ला

मुंबई : ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येत अखेर वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील २० किमी लांबीचा दहिसर – डहाणुकरवाडी – आरे दरम्यानचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल केला. जानेवारी २०२३ मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल झाला आणि ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका कार्यान्वित झाली.

ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सुरुवातीला काही हजारांवर असलेली दैनंदिन प्रवासी संख्या हळूहळू लाखांवर गेली. आतापर्यंत या दोन्ही मार्गिकांवरून दिवसाला दोन लाख ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. पण आता मात्र यात वाढ झाली असून दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात या दोन्ही मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्येने दहा कोटींचा पल्ला गाठला आहे.

Comments
Add Comment