Monday, August 11, 2025

Devendra Fadnavis : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा!

Devendra Fadnavis : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा!

फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत काय झाला निर्णय?


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महायुतीच्या (Mahayuti) पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली. यावर केंद्रातून हालचाली सुरु झाल्या आणि भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन संपर्क साधला. यानंतर अमित शाह व फडणवीसांची काल दिल्लीमध्ये मीटिंग झाली. रात्री उशिरापर्यंत ही मीटिंग सुरु होती व यात फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान, पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत व त्यावर महायुतीच्या इतर नेत्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील पराभवाच्या कारणांवही चर्चा करण्यात आली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी रचनात्मक काम करण्याची इच्छा अमित शाह यांना बोलून दाखवली. पण, राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.


राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती मिळत आहे. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मानस असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावर दिल्लीतल्या बैठकीत चर्चा झाली. दिल्लीला जाण्याआधी फडणवीसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


दरम्यान, फडणवीसांच्या या निर्णयावर भाजपा पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही फडणवीसांशी बोलून पुन्हा एकदा एकत्र काम सुरु करु, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर अनेक नेत्यांनी महायुतीसाठी फडणवीसांच्या नेतृत्वाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Comments
Add Comment