Monday, June 16, 2025

सदाशिव पेठेतील खासगी संस्थेत आग; वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू, ४० विद्यार्थीनी बचावल्या

सदाशिव पेठेतील खासगी संस्थेत आग; वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू, ४० विद्यार्थीनी बचावल्या

पुणे : सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेत मध्यरात्री आग लागली. संस्थेच्या आवारातील कार्यालयात झोपलेल्या वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली.


सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडून वाणिज्य विषयक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्थेची तीन मजली इमारत असून, तेथे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास संस्थेत आग लागली. आग भडकल्याने त्याची झळ वसतिगृहातील खोल्यांपर्यंत पोहोचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली.


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब, टँकर, रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.


परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली. वसतिगृहातील ४० ते ४२ विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली.


संस्थेच्या कार्यालयात वसतिगृह व्यवस्थापक राहुल कुलकर्णी झोपले होते. त्यांना खोलीतून बाहेर पडता आले नाही. होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली.

Comments
Add Comment