उत्तरा कर्वे, मुंबई ग्राहक पंचायत
पर्यावरण या शब्दाची व्याप्ती खूप विस्तृत आहे. यात हवामानाबरोबरच निसर्गामध्ये आढळणारे मनुष्यासहित सर्व प्राणी, पशू पक्षी, नद्या, जंगल, डोंगरदऱ्या यांचा समावेश होतो. यातील एखाद्या घटकाचे प्रमाण कमी- जास्त झाल्यास पर्यावरणाचा तोल ढळतो. याला फक्त मनुष्य प्राणीच जबाबदार आहे. बुद्धीच्या जोरावर माणूस निसर्गाच्या नियमात ढवळाढवळ करू लागला आणि जणू निसर्गाची घडी विस्कटलेली दिसते.
लोकसंख्या वाढ, वाढते शहरीकरण, मानवी रहिवासासाठी होत असलेली जंगलतोड, पायाभूत सुविधांसाठी होणारे बांधकाम, कारखान्यांचा धूर, कारखान्यातील समुद्रात जाणारे दूषित पाणी, कचऱ्याची मोठ्या प्रमाणावर होणारी निर्मिती, मोठ्या प्रमाणावर होणारा प्लास्टिकचा वापर यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. सरकारी पातळीवर आता यावर बऱ्याच उपाययोजना सुरू झाल्या आहेत. उदा. विजेवर चालणारी वाहने – जी पेट्रोल/डिझेलमुळे होणारे प्रदूषण वाचवतात. मोठ्या/सरकारी आस्थापनांतून सौर ऊर्जेचा वापर, हाऊसिंग सोसायट्यांतून सोलर पॅनल्स बसवून वीज निर्मिती केल्यास विजेच्या येणाऱ्या बिलात सूट वगैरे, कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आणि सोसायट्यांमधून कचऱ्यापासून खत निर्माण करणारी यंत्रणा बसवण्यासाठी प्रोत्साहन, वगैरे. २०२३ मध्ये भारतामध्ये झालेल्या जी २० परिषदेमध्ये जागतिक पर्यावरण बदल यावर विचार झाला. या परिषदेच्या Mission LiFE अंतर्गत पर्यावरणीय ऱ्हास थांबवण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण व्यक्तिगत पातळीवर रोजच्या व्यवहारात काय करू शकतो याची ७ विभागांत एकूण ७५ उदाहरणे उद्धृत केली आहेत.
एक ग्राहक म्हणून आपल्याला शुद्ध पर्यावरणाचा हक्क आहे. पण याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ग्राहक म्हणून आपलं कर्तव्य ५ जून या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक सुजाण आणि सजग ग्राहक म्हणून आपण पर्यावरणाचा स्तर सुधारण्यासाठी खारीचा वाटा कसा उचलू शकतो याचा विचार करूया.
१. आपल्या घरापासून आपण सुरुवात केल्यास प्रथम आपण घरातला कचरा ओला आणि सुका असा वेगळा करतो का? हे पाहायला हवं. ओला कचरा म्हणजेच स्वयंपाक घरात निर्माण होणारा कचरा. यात, भाज्यांचे देठ, साल, उरलेले अन्न, निर्माल्य वगैरेंचा समावेश होतो. या कचऱ्याचे घरच्या घरी आपण खत बनवू शकतो. म्हणजेच तो डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे.
दुसरं म्हणजे सुका कचरा – यात, प्लास्टिक पिशव्या, कागदी पिशव्या, खोके, पुठ्ठे, खाद्य पदार्थांची वेष्टने, टेट्रा पॅक, प्लास्टिकचे डबे, शीतपेयांच्या आणि पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू येतात. घरी रोज येणाऱ्या दुधाच्या पिशव्या किंवा इतर प्लास्टिक याची विल्हेवाट आपण योग्य तऱ्हेने लावतो का? बऱ्याच पर्यावरण प्रेमी संस्था या विषयात भरीव कार्य करत आहेत. असा कचरा गोळा करून या संस्था तो योग्य रीतीने रिसायकल करण्याचे काम करत आहेत. महापालिकासुद्धा आता सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगळे ड्रम्स सोसायट्यांना देते आणि त्यात जमा झालेला कचरा गोळा करून पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जाते.
तिसरं म्हणजे E waste. यामध्ये जुने मोबाइल्स, लॅप टॉप्स, पेनड्राइव्हस, विजेची बंद पडलेली उपकरणे, विजेचे बल्ब्स, वायर यांसारख्या वस्तूंचा समावेश होतो. अशा वस्तू E Waste वर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना दिल्यास त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाईल. तसेच जी जी उपकरणे आपण दुरुस्त करून वापरू शकतो ती दुरुस्त करून घ्यावीत. पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क ड्राईव्ह ऐवजी क्लाऊड स्टोरेजचा वापर करावा. साध्या बॅटरीसेल्स ऐवजी रिचार्जेबल लिथियम सेल्सचा वापर करावा. आपण पाहिले असेल की फ्रीज, एसी यासारख्या उपकरणांवर १ ते ५ असे स्टार रेटिंग दिलेले असते. जितकी विजेची बचत जास्त तितके स्टार जास्त. शक्यतो अशी उपकरणे ५ स्टार रेटिंग असलेली विकत घ्यावी.
२. बाजारात आपण सामान आणण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येक वस्तूबरोबर सिंगल युज प्लास्टिकची एक पिशवी बरोबर आणण्या ऐवजी एखाद-दोन कापडी पिशव्या घेऊन गेल्यास तितका कचरा आपण कमी करू शकतो. (REFUSE)
३. हल्ली घरगुती समारंभामध्ये पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या दिल्या जातात. यात उरलेले पाणी फुकट जाते. आपण आपल्या घरच्या समारंभात पाण्याचा तांब्या, भांडे ठेवल्यास आपल्याला हवे तितकेच पाणी प्रत्येक जण घेईल. यामुळे पाण्याचीही बचत होईल आणि प्लास्टिकचा वापरही कमी होईल. याचबरोबर खाद्यपदार्थ देताना कागदी किंवा प्लास्टिकच्या डिशेस आणि चमचे न वापरता स्टील किंवा काचेच्या डिशेस आणि चमचे वापरल्यास तितके प्लास्टिक कचऱ्यात जाण्यापासून आपण वाचवू शकतो. तसेच चहा/कॉफीसाठी किंवा शीतपेयांसाठी कागदी, प्लास्टिक किंवा थर्मोकोलचे पेले न वापरता स्टीलची फुलपात्र किंवा काचेचे पेले वापरल्यास आपण सुक्या कचऱ्याची निर्मिती काही प्रमाणात कमी करू शकतो. असे प्रत्येकाने केल्यास आपण कितीतरी अविघटनशील घटक कचऱ्यात जाण्यापासून थांबवू शकतो (REDUCE).
मुंबई ग्राहक पंचायतीने शाश्वत जीवन शैलीचा कायमच पुरस्कार केला आहे आणि वितरणात कापडी पिशव्या वापरून याचा पुरावाच दिला आहे. हे वाणसामानाचे मासिक वितरण ग्राहकांच्या गटाला एकाच वेळी होते. त्यामुळे इंधनाची मोठी बचत होऊन प्रदूषणाला आळा बसतो. संस्थेचे कार्यकर्ते पर्यावरणासाठी जनजागृती करताना विविध उपक्रम हाती घेतात. उदा. देशी वृक्ष बीज संकलन – कार्यकर्ते सभासदांकडून देशी वृक्षांच्या बिया गोळा करून त्या वृक्षारोपणाच्या कार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थांना देतात. अशा संस्था या बियांपासून रोपे तयार करून ती रस्त्यांच्या कडेला, महामार्गावर, ओसाड ठिकाणी नेऊन रुजवतात आणि त्यांची काळजी घेतात. त्याचबरोबर संस्थेचे कार्यकर्ते हे दुकानदार, भाजी विक्रेते, फुलवाले आणि ग्राहक यांना सिंगल युज प्लास्टिकचे दुष्परिणाम पटवून देऊन रोजच्या वापरासाठी कापडी पिशव्या वापरण्यास उद्युक्त करून जनजागृती करत आहेत. हे उपाय आपण घरगुती पातळीवर नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर आपण एक जबाबदार ग्राहक म्हणून आपले मित्र/मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, कार्यालयीन मित्र/सहकारी यांना याबद्दल अवगत करणे खूप जरुरीचे आहे. म्हणजेच वैयक्तिक पातळीपासून सामाजिक पातळीपर्यंत याबाबत जागृती करणे आपल्याच हातात आहे.
mgpshikshan@gmail.com
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…