नाचता येईना, अंगण वाकडे ही मराठीत प्रचलित म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा सांगितला जातो की, एखादी गोष्ट आपल्याला येत नसते तरीही, परिपक्व व्यक्तीसारखे मान्य न करता आपण काही कमी नाही असे सांगण्याचा आटापिटा करणे. अशा व्यक्ती आपल्या अवतीभवती असतात, अशा लोकांसाठी ही म्हण वापरली जाते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीतील घटक पक्ष ज्या स्थितीत उभे आहेत, त्यांना पाहून आज या म्हणीची आठवण झाली. १८ व्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला. सरकार स्थापनेसाठी २७२ या मॅजिक फिगरची गरज असते. भाजपाप्रणीत एनडीएला सध्या २९२ जागा मिळाल्या. त्यात एकट्या भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत, तर २७ पक्षांनी एकत्र मोट बांधलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला २३४ जागांवर समाधान मानावे लागले. बहुमताचा आकडा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. औपचारिक बैठकीचा एक भाग म्हणून भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए)सदस्यांची दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने नेता म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रपती भवनाकडून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचे आमंत्रण येत्या ९ जूनपर्यंत मिळेल. नैसर्गिक न्याय तत्त्वाने देशातील जनतेने भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत दिले असतानाही, इंडिया आघाडीच्या पोटात सत्तेचा किडा वळवळताना दिसत आहे.
देशातील दीडशे वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत शंभर जागांचा आकडा पार करता आला नाही. याच काँग्रेसच्या हाताचा पंजा पुढे करून, देशभरांतील विविध राज्यांतील मोदी विरोधी लोकांनी एक मोट बांधली. तिला इंडिया आघाडी असे नाव दिले; परंतु ही आघाडी २०२४ च्या निवडणुकीत २७२ चा बहुमताचा आकडा पार करू शकत नाही म्हणून आता एनडीएतील घटक पक्ष कधी फुटतील आणि आपण कधी सत्तास्थापन करू, या आशेवर बसले आहेत. एनडीएतील मित्रपक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) हे दोघे पक्ष फुटतील आणि आपण सत्तेचा दावा करू, अशी गणिते इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी मांडली. त्याचे कारण आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षाचे १६ खासदार आणि बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे १२ खासदार निवडून आले आहेत. दोघे जण इंडिया आघाडीत आले, तर २८ खासदारांचा मोठा पाठिंबा मिळवून सत्तेच्या जवळ जाता येईल, याची स्वप्ने इंडिया आघाडीतील काही नेत्यांना पडली. खासगीमध्ये या नेत्यांनी चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु हे दोघेही नेते बधले नाहीत. दिल्लीतील बैठकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंब्याचे सहमती पत्र टीडीपी नेते एन. चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्यानंतर इंडिया आघाडीतील नेत्यांचा भ्रमनिरास झाला.
खरं तर मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा एनडीएला सगळ्यांत जास्त जागा मिळाल्या आहेत, ही बाब लपून राहिलेली नव्हती. त्यामुळे भाजपाप्रणीत एनडीए आघाडी सत्तेवर येणार हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ दिसत असतानासुद्धा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या काही विधानांमुळे इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण, बहुमताचा जादुई आकडा कुठून आणणार हे सत्य माहीत असतानाही, जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीनंतर एकमेकांचे चेहरे पाहिल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. सत्तेत जाण्यासाठी सर्व उत्सुक असले तरी, दोन डझनपेक्षा जास्त पक्ष एकत्र असतानाही साधा बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे मोदी सरकारला जनतेच्या समोर तानाशाही कारभारावरून खलनायक ठरविण्याचा प्रयत्न विरोधकांचा फसला, हे त्यांनी कबूल करायला हवे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप, केरळमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे एकमेकांच्या विरोधात लढले. तरीही आम्ही इंडिया आघाडीचा भाग असल्याचा प्रयत्न या पक्षांनी केला, तो भाग जनतेला मान्य झालेला नाही, हेही निकालावरून दिसून येते. आता एनडीए पक्षातील कोणी आपल्या बाजूने आले तर त्यांचे स्वागत करू, असे म्हणण्याची वेळ खरगे यांच्यावर आली. विशेष म्हणजे संविधानाचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. जे पक्ष संविधान वाचविण्यासाठी एकत्र येतील त्यांना सन्मानाने आमच्या सोबत घेऊ, अशी भावनिक साद घालायला खरगे विसरले नाहीत. भाजपाप्रणीत एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आले तर संविधानाला धोका निर्माण होईल, अशी भीती जनतेच्या मनात घालून, इंडिया आघाडीच्या पदरात ज्या जागा पडल्या त्यात संविधानाच्या अपप्रचाराचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरला होता, हे निकालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या इंडिया आघाडीतील नेत्यांनाही एनडीएतील घटक पक्ष फुटून संविधानाच्या मुद्द्यावर येतील, असे वाटू लागले आहे. बहुमताचा आकडा गाठणे शक्य नसतानाही, सत्तेच्या सारीपाटात कधी सोंगटी आपल्या हातात येईल, याची वाट पाहत राहणं एवढंच काम आता इंडिया आघाडीच्या नेत्यांना बाकी राहिले आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…