अग्निशमन दलाच्या १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल
पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज सकाळी सातच्या सुमारास एका कंपनीला भीषण आग लागली. रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीत ही आगीची घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की ती पसरल्याने शेजारील दोन कंपन्यांनाही आग लागली. या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना घडली. एका कंपनीच्या आगीमुळे शेजारी- शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कुदळवाडी परिसरातील आर के ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे.
सुदैवाने आज कंपन्यामधील कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या १५ पेक्षा अधिक अग्निबंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये रबरचे मटेरियल बनत असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.