निकालानंतर पहिल्यांदाच आले मीडियासमोर…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Loksabha Election results) अजित पवार गटाला (Ajit Pawar group) अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. चार जागांपैकी अजितदादांचा केवळ एक खासदार निवडून आला. याऊलट शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) दहापैकी आठ खासदार निवडून आले. यानंतर आज अजितदादांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघातील अजित पवार गटाचे विजयी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, तसेच पक्षाची पुढील रणनिती काय असणार याविषयी त्यांनी सांगितले.
सुनील तटकरे म्हणाले, लोकसभेत अपेक्षित असलेलं यश पक्षाला आणि महायुतीला मिळू शकलं नाही. त्याची कारणे काय आहेत, त्यावर चर्चा झाली. सकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. जून १० ला पक्षाचा वर्धापनदिन आहे, त्यादृष्टीने काय कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, सामाजिक उपक्रम काय असतील यावर चर्चा झाली आहे.
सकाळी झालेल्या कोअर कमिटीत काय चर्चा झाली याची माहिती आमदारांच्या बैठकीत देणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. तसेच आमदारांची मते जाणून घेऊ. मतदारसंघानिहाय आमदारांकडून तेथील स्थितीची माहिती घेतली जाईल. लोकसभेच्या निवडणुकीत काय उणिवा राहिल्या हे जाणून घेऊ. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आक्रमकपणे काम करू. तसेच आम्ही महायुतीसोबत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
मित्रपक्षांचे मतांमध्ये रुपांतर झालं नाही
सकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत काही लोकसभा मतदारसंघात महायुती असून मित्रपक्षांचं मतांमध्ये रुपांतर झालं नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. काही विधानसभा मतदारसंघात युतीचे नेते एकत्र होते, पण स्थानिक पातळींवर कार्यकर्त्यांनी मते न दिल्याची स्थिती यावर काही नेत्यांचा बैठकीत सूर उमटला, असे तटकरे म्हणाले.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करा
महाराष्ट्रातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करा, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बदलायची असेल तर, १५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी नेत्यांनी अजित पवारांकडे केली आहे. तसेच एक राज्य मंत्री आणि एक कॅबिनेट पदाचीही मागणी कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. परंतु कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यमंत्रिडळावर कोणतीच चर्चा झाली नसून त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चा करतील अशी माहिती तटकरे यांनी दिली.