Thursday, June 12, 2025

Gold Smuggling : तब्बल ७८ लाखांच्या सोन्याची दुबईहून पुण्यात तस्करी!

Gold Smuggling : तब्बल ७८ लाखांच्या सोन्याची दुबईहून पुण्यात तस्करी!

पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई


पुणे : पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत (Pune crime) प्रचंड वाढ झाली आहे. ज्या ठिकाणाला विद्येचे माहेरघर समजले जाते, त्या ठिकाणाला कलंक लावणार्‍या घटना घडत आहेत. पुणे विमानतळावर तर अनेकदा सोन्याच्या तस्करीच्या (Gold Smuggling) घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली असून पुणे विमानतळावर (Pune Airport) तब्बल ७८ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईहून (Dubai) आलेल्या एका विमानात ही कारवाई करण्यात आली.


पुणे विमानतळावरून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे मागील काही महिन्यात झालेल्या कारवाईवरून समोर येत आहे. यातच काल दुबईहून आलेल्या एका विमानात सीटखाली एका पॅकेटमध्ये सोने आढळून आले. तब्बल १ किलो (१०८८.३ ग्रॅम) चोवीस कॅरेट सोने या कारवाईत सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे.



नेमकं काय घडलं?


बुधवारी दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी आणि झाडाझडती केली. त्यावेळी वैयक्तिक झडतीत किंवा सामानाच्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे कस्टम विभागही काही काळ गोंधळून गेले होते. नेमके या प्रवाशाने सोने कुठे ठेवले असेल? हा प्रश्न पडला होता.


प्रवाशाचे वर्तन अतिशय संशयास्पद असल्याने त्याने विमानात काही लपवले आहे का, अशी विचारणा करण्यात आली. त्याने दिलेल्या उत्तरांमुळे कस्टम विभागाचा संशय आणखी वाढला. त्यानंतर त्याच्या सीटसह विमानातील इतर काही जागा शोधण्यात आल्या. झडतीदरम्यान तो बसलेल्या सीटखाली पाईपमध्ये सोन्याच्या पेस्टचे पाकीट लपवून ठेवलेले आढळून आले. हे जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे होते. त्याचे वजन १०८८ ग्रॅम असून त्याची किंमत ७८ लाख १ हजार ४३ रुपये आहे. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment