लाच मागणाऱ्या निरीक्षकालाही घेतले ताब्यात
सातारा : लोकसभा निवडणुकांदरम्यान (Loksabha Election) अनेक ठिकाणांहून काळ्या पैशांचा (Black money) पाऊस पडत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता सांगलीतून (Sangali) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सातार्याच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवे (Sapana Ghalave) यांना सांगलीत तब्बल एक लाख रुपयांची लाच (Satara Bribe) घेताना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर दहा हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक करण्यात आली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातार्याच्या समाज कल्याण अधिकारी असलेल्या सपना घाळवे यांच्याकडे सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार होता. त्यांनी शिक्षण संस्थेकडे लाच मागितली होती. सांगलीतील समाज कल्याण कार्यालयात लाचलुचपत विभागाने कारवाई करत त्यांना रंगेहाथ पकडले. शिवाय लाच मागणाऱ्या निरीक्षकलाही ताब्यात घेतले.
नेमकं प्रकरण काय?
सांगलीतील एका शिक्षण संस्थेमध्ये इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्या अनुदानापोटी लाचेची मागणी करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना ५९ लाख ४० हजाराचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. याचा पहिला हप्ता म्हणून २९ लाख ७० हजाराचा धनादेश देण्यात आला होता. याच्या कमिशन पोटी सपना घोळवे यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना सपना घोळवे यांना लाचलुचपतने रंगेहाथ अटक केली. तर हप्त्याचा धनादेश दिल्याबद्दल दहा हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक करण्यात आली.
कसा रचला सापळा?
याबाबत तक्रारदार असलेल्याची एक शैक्षणिक संस्था आहे. लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार संस्थेच्या पदाधिकारी यांनी ५ जून रोजी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये घोळवे यांनी सहा लाख रुपये लाच मागितली. चर्चेअंती पाच लाख रुपये व त्यानंतर अडीच लाख रुपये लाचेची मागणी करत पहिला हप्ता एक लाख रुपये लगेच घेऊन येण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना घोळवे यांना रंगेहाथ पकडले. तर याच कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रमशाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून दहा हजार लाचेची मागणी केल्याबद्दल अटक केली.