ऋतु राज – ऋतुजा केळकर
जो मेरे पास है…
वो किसी और के पास नहीं..
करम की बोरी है साथी…
मुझे ही उठानी है….
किसी और को नही…
लिहिता लिहिता माझा हात थांबला. आयुष्याची अखेर आल्याची जाणीव झालेला ‘तो’ समोर अखेरच्या घटका मोजत होता. इकडे तिकडे पाहिलं तर दवाखाना पूर्ण भरलेला होता. कुणी दुःखात तर कुणी डिस्चार्ज मिळाल्याने भराभर आवरून आपल्या घरी परतण्याच्या आनंदात.
मग अचानक जाणीव झाली… मरण तर कधीतरी येणारच आहे हो… मग आपण त्याच्या वाटेकडे डोळे लावून झिजत… रडतं… खुरडत-खुरडत… जगण्यापेक्षा… जीवनाच्या उत्सवाचा एक हिस्सा व्हावं… जीवन यात्रेतील प्रत्येक क्षणाचा असा उपभोग घ्यावा की, आपल्या आयुष्यात आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीतून आपल्या कर्माची पोतडी खूपच छान पद्धतीने पद्धतशीररीत्या जड होईल.
एखाद्या वृक्षाकडे पाहा, त्याची पानं जेव्हा पिकून… गळून… पडतात तेव्हा त्याचा फक्त कचराच होतो आणि कालांतराने ती कुजून त्याचा घाणेरडा वास आसमंतात सुटतो. माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे त्यांना प्रत्येकाच्या कृतीत काही ना काही तरी चूकच आढळते. कुणाच बरोबर मुळी नसतंच त्यांच्या दृष्टीने… आणि त्यावर ते सदैव वाईट पद्धतीने भाष्य करतच असतात. अर्थात कदाचित काही वेळा ते बरोबर असतीलही पण म्हणून त्यांच्या या कृतीमुळे बरेचदा त्यांच्या आजूबाजूच्या साऱ्यांना अतिशय मनस्ताप आणि त्रास होतो. मग अशा या कर्माचा काय बरं फायदा? कसं आहे ना माणसाने मेहंदीच्या पानासारखे बनावं. स्वतःला कुस्करून घ्यावे पण दुसऱ्याच्या आनंदात… जीवनात आपल्या सुविचारांचे… संस्कारांचे… सद्सत् विवेकाचे रंग भरावेत.
मग कुणी म्हणेल की , मग आपलं कर्म तरी कसं असावं…? अगदी बरोबर प्रश्न आहे पडलेला आपल्याला. “आपल्या प्रत्येक श्वासाने सुविचारांचे थेंब पुलकित होऊन आत्म्याच्या स्वाती नक्षत्राच्या शिंपीत पडलेला ज्ञानाचा आणि सत्कर्माचा टपोरा मोती बनणं म्हणजेच आपलं कर्म.”
इथं एक छोटीशी गोष्ट आठवून पाहा, आपण जर आपल्या अंगणात कडुलिंबाच्या रोपट्याची लागवड केली आणि त्याला जर मधुर रसाळ आंबे येतील अशी अपेक्षा केली तर ती किती बिनबुडाची आणि अवाजवी ठरेल नाही का…? तसं होणार आहे का? नाही ना… तसंच आहे. आपण जे काही करतो तेच जसेच्या तसे आपल्याकडे दामदुपटीने परत येतं. जसा आपण एखादा बॉल भिंतीच्या दिशेने जोरात फेकला तर तो दुप्पट वेगाने आपल्याकडे भिंतीवर आपटून परत येतो अगदी तसंच आपण समोरच्याला जे देतो तेच दामदुपटीने आपल्या झोळीत पडतं. काही वेळा त्या कर्माची फळं ताबडतोब मिळतात तर काही वेळा ती उशिराने पण आपल्या प्रत्येक कर्मांची मग ती भली असोत अगर बुरी त्यांची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. म्हणूनच आपण जर मारामारी केली तर समोरचा गप्प बसून मार खाईल का? किंवा त्यावेळी तो शांतही बसेल पण नंतर त्याचा वचपा काढल्याशिवाय तो राहील का? होय की नाही सांगा बरं? समोरचा बघेल बघेल आणि एक दिवस असा फटका देईल की आयुष्यभर तो धडा तुमच्या लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच आपल्या जीवनाच्या मरूद्यानात उदात्त आचार विचारांच्या दवबिंदूंची नेहमीच अशी शिंपणं करा की आपल्याच नव्हे तर दुसऱ्याचा जीवन यात्रेचा मार्ग ही सोनेरी होईल. मला मान्य आहे आज सत्ता आणि संपत्ती यांच्या नशेत यशाच्या धुंदीत माणसं मस्तवाल झालेली आहेत. स्वार्थापोटी, आपमतलबीपणामुळे नात्यांची कोवळीक तसेच उपकारांचा विसर साऱ्यांनाच पडत चालला आहे. पण मग माझ्या शब्दातच सांगायचे झाले तर…
“राग द्वेषापरी…
बुद्धी भ्रष्ट जाहली…
परी संयमाने…
आत्मशुद्धी लाभली…”
म्हणूनच आपण काय करतोय त्या कृतीकडे… त्या शब्दांकडे आपले लक्ष असलेच पाहिजे. नुसते उंची वस्त्रालंकार वापरले म्हणजे माणूस श्रेष्ठ ठरत नाही बरं. मनाच्या रोगटपणामुळे तसेच स्वतःच्या कृतीचे उद्दातीकरण करून दुसऱ्याचं श्रेय लाटल्यामुळे आपल्या दुष्कर्मांची पोटली जड होते.
तलम कपड्यांनी, दागदागिन्यांनी शृंगारलेल्या शरीराच्या आत जर द्वेष, काम, क्रोध, मद आणि मत्सर यांनी भरलेले मन असेल तर ती व्यक्ती कधीच सुखी-समाधानी आणि आनंदी राहू अगर दिसूच शकत नाही.
मृत्यूच्या समीप असताना देहाच्या वाळलेल्या पानांचा जीर्णपणा हा अंतर्नादाने आपल्या कर्माचा वेल्हाळपणा आपल्याला पदोपदी जाणीव करून देत असतोच तेव्हा पश्चात्ताप करण्यापेक्षा षङरिपूच्या मायाजालात अडकून न राहाता आपल्या शब्दांच्या कट्यारी म्यानात ठेवून मृत्यूची निमंत्रण पत्रिका मिळण्यापूर्वीच संयमित तसेच सुसंगत अशी सत्कर्मे करून प्रसन्नतेची बिजझुंबरे आपल्या जीवनाच्या शिलालेखावर अशी कोरून ठेवा की जन्म- मृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला अडकावंच लागणार नाही आणि मग आपल्या अस्तित्वाच्या मयुरगोंदणी… निरांजनी… कोनाड्यात नवनिर्मितीची… सृजनतेची ही संध्यावात आपल्या देहमुक्तीनंतरही ऋतुचक्रात चिरकाल तेवत राहील.