निलेश राणे यांचा सामंत बंधूंना इशारा; काय आहे प्रकरण?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार (Loksabha Election results) महायुतीला (Mahayuti) राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला समजले जाणारे कोकण भाजपाने आपल्या ताब्यात घेतले. या ठिकाणी नारायण राणे (Narayan Rane) यांचा ४८ हजार मतांच्या आघाडीने दणदणीत विजय झाला. मात्र, ही लढाई सोपी नव्हती. या प्रवासात महायुतीतच काही मतभेद झाल्याचेही समोर आले. यानंतर आता नारायण राणे यांचे सुपुत्र व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर जोरदार टीका केली आहे. तसेच राणे कधीही माफ करत नसतात असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उदय सामंत (Uday Samant) यांच्या मतदारसंघात नारायण राणे पिछाडीवर गेल्याने निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर आरोप केले आहेत. निलेश राणे म्हणाले, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. पालकमंत्री असून देखील ते आम्हाला लीड देऊ शकले नाहीत. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत.
उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. विजयी मिरवणुकीतही उदय सामंत दिसले नाहीत. ते का आले नाहीत हे त्यांनाच विचारा असं निलेश राणे म्हणाले.
निलेश राणे यांचा खळबळजनक दावा
निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा निलेश राणे यांनी केला. त्याचे आपल्याकडे पुरावे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची माहिती देणार असल्याचं निलेश राणे म्हणाले.