माझे कोकण: संतोष वायंगणकर
देशामध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्रात सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणारा लोकसभा निवडणुकीतील निकाल आहे. महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात कोकणामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचे कोकणातील सर्व उमेदवार निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सर्व लोकसभा मतदारसंघांत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणवासीयांनी नाकारले आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली मतदारसंघांतून श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्वासाठी जनतेने कौल दिला.
पालघरमधून भाजपाचे हेमंत सावरा विजयी झाले. ठाणे जिल्हा उबाठासेनेचा बालेकिल्ला म्हटला जायचा; परंतु ठाणे मतदारसंघातही शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत; तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव करीत राणे संपले नाहीत, तर राणे जिंकले. कोकणातील एकाही लोकसभा मतदारसंघात उबाठासेनेला विजय मिळवता आलेला नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने सांगत असत; परंतु कोकणाने दाखवून दिले कोकण उबाठाचा नव्हता, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कोकणचा मतदार आहे. यामुळेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट असलेल्या पूर्वाश्रमीच्या एका शिवसैनिकाला निवडून दिले आहे. महायुतीच्या कोकणातील लोकसभा निवडणुकीतील विजयाने कोकणात उबाठा सेनेला जनतेने मोठा धक्का दिला आहे. कोकणवासीयांना या निवडणुकीत विकासावर चर्चा अपेक्षित होती; परंतु तशी विकासावर चर्चा करण्यातच आली नाही. फक्त टीकाटिप्पणी होत राहिली. या निवडणूक निकालाने कोकणातील राजकीय संदर्भही बदलले जाणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच एक वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. रायगड मतदारसंघातही सुनील तटकरे यांनी अनेकांचे अंदाज चुकवत विजयी होत दाखवून दिले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात हेमंत सावरा यांना उमेदवारी देताना पूर्वीच्या खासदारांना थांबवले होते, यामुळे अनेकांनी हेमंत सावरा निवडून येणार की नाही ही शंका घेतली होती; परंतु हेमंत सावरांनी विजय प्राप्त करीत कोकणातील भाजपाचे वर्चस्वही सिद्ध केले आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र श्रीकांत शिंदे यांना पराभूत करण्याचे आडाखे उबाठाकडून आखले जात होते. मात्र कल्याण-डोंबिवलीच्या जनतेने पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांच्या बाजूनेच कौल दिला आहे, तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हे ठरत नव्हते.
शिवसेनेचे रवींद्र फाटक, आ. प्रताप सरनाईक अशी नावे पुढे येत होती. मात्र शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक, महापौर राहिलेल्या नरेश म्हस्के यांना या लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले आणि महायुतीच्या नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी विजयी केले. ठाणे जिल्हा हा उबाठाचा बालेकिल्ला असण्याचा दावा केला जात होता. मात्र नरेश म्हस्केंना निवडून देत ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असण्याचे सिद्ध केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपा महायुतीचे नारायण राणेच विजयी होतील हा राजकीय निरीक्षकांना विश्वास होता; परंतु राणे विरोधकांकडून सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे संपले म्हटले जायचे; परंतु या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील जनतेने नारायण राणे यांच्या बाजूने कौल देत राणे विरोधकांना गप्प केले आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नारायण राणे राजकारणातून संपले म्हणणाऱ्यांना नंतरच्या काळात ज्या पद्धतीने नारायण राणे विधान परिषद, राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री या पदांवर काम करत राहिले तरीही राणेंचे सिंधुदुर्गात काहीच नाही केले, असे सातत्याने बोलणारे आणि विरोधासाठी विरोध करणारे विरोधक होते. त्या सर्वांना गप्प करत कोकण, सिंधुदुर्ग पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोकणातील जनता आजही नारायण राणे यांच्यावर तितकाच विश्वास आणि प्रेम करते हे देखील लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने दाखवून दिले आहे. राणे कधीच संपले नाहीत, तर एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ते नेहमी नव्या उमेदीने लोकांसमोर जात राहिले आणि कोकणातील जनतेनेही कधी रुसवा व्यक्त केला असला तरीही अवघा कोकण राणेंचाच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.