लहान मुलांसह ३० जणांचा मृत्यू
जेरुसलेम : काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलने (Isarel ) रफाह (Rafah) शहरावर हल्ला केला होता. त्यामध्ये ४५ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २०० हून अधिक जण जखमी झाले होते. हे प्रकरण ज्वलंत असतानाच इस्त्रायलने गाझा येथे हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. इस्त्रायल-हमासची (Isarel Hamas War) दंगल अजूनही सुरुच असल्याने या गोष्टीचा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यासोबत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायल लष्कराने गाझामधील शाळेवर बॉम्ब हल्ला केला आहे. या शाळेमध्ये अनेक पॅलिस्टिनी नागरिक आश्रय घेत होते. इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने या शाळेच्या तीन वर्गांवर हल्ला केला. त्यामुळे या वर्गातील अनेक लहान मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
नरसंहार गुन्ह्याची जबाबदारी घेणे गरजेचे
इस्त्रायली सैन्याने केलेल्या या हल्ल्यावर हमासने निषेध व्यक्त केला आहे. हा एक भयानक नरसंहार असल्याचे म्हटले जात आहे. इस्त्रायल सैन्याने हे हल्ले चालू ठेवणे म्हणजे नरसंहार गुन्हा करणे आहे. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या या गुन्ह्यांची जबाबदारी इस्त्रायल आणि अमेरिकेने घेतली पाहिजे, असे गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने म्हटले आहे.
दरम्यान, इस्त्रायलने यापूर्वी रफाह शहरावर केलेल्या हल्लामुळे अनेक लोकांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त केला होता. त्याबाबत सोशल मीडियावर ‘ऑल आइज ऑन रफाह’ (All Eyes On Rafah) असा ट्रेंडदेखील सुरु होता. मात्र आता पुन्हा गाझामधील शाळेवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.