गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला
रोहिणी नयनीश पिंपरकर, बंगलोर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव. मी लहानपणापासून महाराजांची सेवा करायची. कारण माझ्या बाजूच्या काकू करायच्या म्हणून मी पण त्यांचासोबत सेवा करायची. मी त्यावेळेस वर्ग ११ वीमध्ये असेल. तेव्हापासून माऊली माझ्याकडून सेवा करून घेतात. सायंकाळी बावन्नी म्हणायची. महाराजांच्या छोट्या पोथीचे पारायण करायची. माझी महाराजांवर खूप श्रद्धा बसली होती. जेव्हा मी गरोदर होते त्यावेळेस मला स्वप्न पडले. साधारण पहाटेचे ३.३० – ४.०० वाजले असतील. झोपतेच बडबड करत होते मी (असे अहोंनी सांगितले.) मला स्वप्नात श्री महाराजांची समाधी दिसली. या आधी मी कधीही श्री गजानन महाराजांची समाधी पाहिलेली नव्हती.
महाराजांनी मला विचारले, “काय पाहिजे माय तुला?” तेव्हा मी झोपेतच बोलले “तुमच्या प्रसाद रूपात मला मुलगी हवी आहे आणि आजीवन तुमची सेवा घडावी हीच इच्छा आहे माझी.” मी झोपेतच बोलले “आपल्या पोथीची १००१ पारायणे पूर्ण होतील माझ्याकडून अशी सद्बुद्धी मला द्या.” (हे माझे सर्व बोलणे अहोंनी ऐकले.) मी झोपेत होते आणि काय बडबड करते आहे ते पाहायला ते उठले. सकाळी त्यांनी मला विचारलं, “रात्री काय बोलत होतीस? १००१ पारायणं… तुमची सेवा… वगैरे?”
त्याच गरोदरपणात मी रोज एक पारायण करायची छोट्या पोथीचे. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली आणि मला समजले की, मी एका गोंडस मुलीला जन्म दिला, तेव्हा तर माझी अजूनच जास्त श्रद्धा बसली आणि मी केलेला १००१ पारायणांचा नवस पूर्ण केला. याकरिता मला ५ वर्षे लागली आणि मी मुलीला महाराजांच्या दर्शनाला शेगावला घेऊन गेले. ही गोष्ट २०१४ सालातली आहे. तेव्हा मी पहिल्यांदा महाराजांची समाधी स्थळ पाहिले. आश्चर्य म्हणजे जसे मी स्वप्नात पाहिले अगदी तसेच समाधी स्थळ होते. समाधीचे दर्शन होताच मी भाववीभोर झाले, खूप ढसाढसा रडले मूर्तीला पाहून.
तेव्हापासून ते आजपर्यंत श्री महाराजांची सेवा ही सुरूच आहे माझी. माझी लेक पण श्री महाराजांची सेवा करते. श्री महाराजांची सेवा अशीच अविरत घडत राहो, माऊलीची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो हीच सदिच्छा माऊलीच्या चरणी.