शिकवण्याचे दोन प्रभावी मार्ग आहेत. एक म्हणजे, माणसाने जे घ्यावं, त्याचं सुंदर चित्र देणं. दुसरा मार्ग म्हणजे जे टाकावं, त्याचं भयंकर वर्णन करणं. ज्ञानेश्वर या दोन्ही पद्धती वापरतात. त्यामुळे श्रोते ‘जागे’ होऊ लागतात. माणसांना असं जागृत करण्याचं संतसाहित्याचं कार्य ‘ज्ञानेश्वरी’तूनही प्रभावीपणे केलं आहे. म्हणून ते ‘ज्ञान’देव!!
ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
ज्ञानदेव हे अतिशय रसिक, सौंदर्यदृष्टी असलेले कवी आहेत. म्हणून निसर्ग आणि मानवी जीवनातील सुंदर गोष्टींचे दाखले ते देतात. त्यातून तत्त्व, शिकवण स्पष्ट करतात. विशेष म्हणजे वेळप्रसंगी, गरजेनुसार अगदी किळस वाटावी असं वर्णनही ते चितारतात. तेही इतकं प्रभावी आणि परिणामकारक आहे! याचा अनुभव देणाऱ्या अठराव्या अध्यायातील या ओव्या आज बघूया.
यात सांगण्याचा विषय आहे तामस ज्ञान. हे खरं तर ज्ञान नव्हेच. असं ‘तामस ज्ञान’ असणाऱ्या माणसाची वागणूक कशी असते? तर संपूर्ण अविचाराने भरलेली, नकोशी! त्याचे नेमके असे दृष्टान्त ज्ञानदेव देतात!
‘उंदराने सोने चोरले असता ते चांगले अथवा वाईट हे तो जाणत नाही, अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणी काळे किंवा गोरे असा भेद जाणत नाही.’ ओवी क्र. ५५४ ‘किंवा रानात वणवा लागल्यावर जसा त्याला कसलाच विचार राहात नाही, अथवा प्राणी जिवंत किंवा मेलेला आहे याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते…’ ओवी क्र. ५५५.
‘अरे, कावळ्यास जसा अन्न ओकलेले किंवा वाढलेले साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो.’
ही ओवी अशी–
‘अगा वांता कां वाढिलेया। साजुक कां सडलिया।
विवेकु कावळिया। नाहीं जैसा॥ ओवी क्र. ५५६
या मूळ ओवीतून त्यातील किळस स्पष्ट होते. विशेषतः ‘वांती’ या शब्दाचा वापर किती नेमका! मळमळ, उलटी, शिसारी हे सारे भाव त्यातून दाखवले जातात. पुढे ज्ञानदेव म्हणतात,‘तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा किंवा शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करावा, हे विषयांच्या भरात जो जाणत नाही.’ ओवी क्र. ५५७ (ते ‘तामस ज्ञान’)
या प्रत्येक दाखल्यातून ज्ञानदेव ‘तामस ज्ञान’ किती सुस्पष्ट करत जातात! यातील पहिला दृष्टान्त उंदराचा आहे. उंदीर हा नीच योनीतील जीव आहे, म्हणून त्याने सोनं चोरलं तरी त्याला ते चांगलं की वाईट हे कळत नाही, त्याची तेवढी कुवत नाही. त्याप्रमाणे तामसिक माणसाला चांगलं काय किंवा वाईट काय हे कळत नाही.’ दुसरा दाखला ‘मांसाहारी माणसाचा’. त्याला मांसाविषयी इतकी गोडी असते की ते कसंही असलं तरी तो ते खाणारच.’
पुढचं उदाहरण ‘रानातील वणव्या’चं आहे. ‘वणवा’ म्हणजे मोठी आग; जी सर्व गोष्टी जाळून भस्मसात करते. त्यानंतर ‘माशी’ या क्षुद्र जीवाचं अविचारी वर्तन मांडलं आहे. पुढे येतो ‘कावळा’ हा सामान्य जीव. तोदेखील किळसवाण्या गोष्टींवर बसतो.
इथे आपल्याला उमगतं ज्ञानदेव किती साजेसे, सहज आणि सोपे दाखले देतात! उंदीर, माशी, कावळा हे दृष्टान्त क्षुद्र जीवांचे घेतले आहेत. ‘मांसाहारी माणूस’ हा पुढचा दाखला तर ‘वणवा’ हे दाहकता दाखवण्यासाठी योजलेलं उदाहरण आहे. या दाखल्यांत किळसवाणेपणाचा चढता क्रम आहे. एकापेक्षा एक ओंगळवाणी चित्रं दाखवून ज्ञानदेव तमोगुण, तामस ज्ञान याविषयी श्रोत्यांच्या मनात तिरस्कार उत्पन्न करतात.
तामस ज्ञान हे नावाप्रमाणे तमोगुणावर आधारलेलं म्हणून ते सगळ्यांनी टाळायला हवं. तत्त्वज्ञ म्हणून ज्ञानेश्वर हे टाळावं असं सांगतात, त्याचा मार्ग दाखवतात. कवी म्हणून या अज्ञानाचं असं किळसवाणं दृश्य नजरेसमोर मांडतात. त्यामुळे सामान्यांतल्या सामान्य माणसाला ही शिकवण कळते. म्हणून वागताना तो सावध होतो.
शिकवण्याचे दोन प्रभावी मार्ग आहेत. एक म्हणजे, माणसाने जे घ्यावं, त्याचं सुंदर चित्र देणं. दुसरा मार्ग म्हणजे जे टाकावं, त्याचं भयंकर वर्णन करणं. ज्ञानेश्वर या दोन्ही पद्धती वापरतात. त्यामुळे श्रोते ‘जागे’ होऊ लागतात. माणसांना असं जागृत करणं हेच तर सगळ्या संतसाहित्याचं कार्य आहे. ‘ज्ञानेश्वरी’तूनही ते अशा प्रभावीपणे केलं आहे. म्हणून ते ‘ज्ञान’देव!!