मुंबई: आयर्लंडविरुद्ध टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) आपल्या पहिल्याच सामन्यात भले टीम इंडियाने विजयी सुरूवात केली आहे. मात्र यासोबतच चाहत्यांसाठी बुधवारी एक वाईट बातमी समोर आली. सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला खांद्याला दुखापत झाली. यानंतर त्याला आपली खेळीही पूर्ण करता आली नाही.
बॅटिंग करत असतानाच मध्येच त्याला मैदान सोडून डगआऊटला परतावे लागले. टीव्ही स्क्रीनवर हिट मॅन टीम इंडियाच्या फिजिओसोबत परत जाताना दिसला. पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्डकप सामन्याआधी टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे याबाबत खुद्द हिटमॅनने प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान माहिती दिली. त्याने यावरून सवाल केला असता सांगितले की हे छोटेसे दुखणे आहे. प्रेझेंटेशनदरम्यान तो अतिशय कूल दिसत होता. यावरून हे समजते की त्याची दुखापत ही गंभीर नाही.
टीव्ही रिप्लेमध्ये दाखवले की हिटमॅन पुलशॉट लगावण्याच्या प्रयत्नात चुकला आणि यानंतर बॉल त्याच्या खांद्याला लागला. आगामी भारत-पाकिस्तान सामना पाहता रोहित शर्माची उपस्थिती संघासाठी अतिशय गरजेची आहे.