काय झाला संवाद?
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागांवर विजय मिळवला. यानंतर काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्वाकडे केली. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत घोषणा केली. अनपेक्षित जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, त्यांच्या या निर्णयावर भाजपा पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही फडणवीसांशी बोलून पुन्हा एकदा एकत्र काम सुरु करु, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर अनेक नेत्यांनी महायुतीसाठी फडणवीसांच्या नेतृत्वाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता थेट केंद्रातून हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन संपर्क साधला. ‘प्रत्यक्ष भेटून चर्चा करु’, असं अमित शाह यावेळी त्यांना म्हणाले आहेत.
अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधत झालेल्या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसंच जे काही आहे त्याबाबत दिल्लीमध्ये भेटून सविस्तर बोलू, असं आश्वासनही त्यांना दिलं. उद्या भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीतच शाह व फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते फडणवीसांना काय मार्गदर्शन करतात, तसेच त्यांना पुन्हा एकदा राज्यात नेतृत्व करण्याची विनंती करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.