
पुन्हा एकदा एनडीएची सत्ता स्थापन होणार
नवी दिल्ली : लोकसभेचा निकाल (Loksabha Election) लागल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi) सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांची या निवडणुकीदरम्यान चांगली कामगिरी केली आहे. भाजपा व त्याच्या मित्रपक्षांची आघाडी असलेल्या एनडीएने (NDA) २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३२ जागा मिळवल्या आहेत. यानंतर आता सत्तास्थापनेच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. यासोबतच नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रिक होणार असून ते पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ८ जून रोजी संध्याकाळी शपथविधी सोहळा होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भातील तयारीबाबत विचारमंथन सुरू झाले आहे.
२०१९ च्या निकालानंतर ७ दिवसांनी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. २०१४ मध्ये जेव्हा NDA सरकार स्थापन झाले तेव्हा १० दिवसांनी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यावेळेस निकालानंतर ४ दिवसांतच मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
मोदी रचणार नवा विक्रम
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता.
दिल्लीत आज एनडीएची महत्त्वाची बैठक
आज दुपारी ४ वाजता दिल्लीत एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. यात जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि शपथविधी यावर चर्चा होणार आहे.