
दिल्लीमध्ये नेमकं काय घडणार?
नवी दिल्ली : लोकसभेचा निकाल (Loksabha Election) लागल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi) सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांची कामगिरी चांगली असल्यामुळे तसेच काँग्रेस किंवा भाजपा यांपैकी कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, आणखी एका गोष्टीमुळे नितीश कुमार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दिल्लीला जाण्यासाठी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपा व त्याच्या मित्रपक्षांची आघाडी असलेल्या एनडीएने २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर इंडिया आघाडीनेही २३२ जागांसह चांगली कामगिरी केली आहे. यानंतर आज दोन्ही आघाडींची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांच्या विजयी खासदारांना दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्ली आज देशातील मोठ्या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान बनणार आहे.
याचदरम्यान, किंगमेकर होण्याची संधी असलेले नितीश कुमार यांच्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. बिहारमधून नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीसाठी विमानातून निघाले. त्याचवेळी तेजस्वी यादव देखील त्याच विमानातून दिल्लीला निघाले. यामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या संपर्कात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू असल्याची माहिती मिळत आहे. तर इंडिया आघाडीकडून अखिलेश यादव यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली आहे. अखिलेश यादव आज चंद्रबाबू नायडू यांना दिल्लीत भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. तर तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे, अशी माहिती मिळत आहे.