एनडीए व इंडिया आघाडीचे नेते बैठकींसाठी दिल्लीत दाखल
नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून भाजपा व त्याच्या मित्रपक्षांची आघाडी असलेल्या एनडीएने २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर इंडिया आघाडीनेही २३२ जागांसह चांगली कामगिरी केली आहे. यानंतर आज दोन्ही आघाडींची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांच्या विजयी खासदारांना दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्ली आज देशातील मोठ्या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान बनणार आहे.
राजधानी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांची कामगिरी चांगली असल्यामुळे तसेच काँग्रेस किंवा भाजपा यांपैकी कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत असतील.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत एनडीएच्या बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व मित्रपक्षांना बोलावण्यात आले असून महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी जाणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीचीही आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची साथ कोणाला मिळणार? यावर सत्तेच्या सारीपाटाचा खेळ रंगणार आहे.