रोहित गुरव
हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, माणूस, सजीव या सर्वांनी मिळून पर्यावरण बनते. हा प्रत्येक घटक पर्यावरणाच्या साखळीसाठी उपयुक्त असतो. तसेच यांचे ठरावीक प्रमाण पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्त्वाचे असते. यातील कोणत्याही घटकात मोठ्या प्रमाणात घट झाल्यास त्याचे परिणाम मग सजीव सृष्टीला भोगावे लागतात. जगणे असह्य करणारी तापमानवाढ, घामाच्या धारा फोडणारी गरमी, निसर्ग, शाहीन, तोक्ते यांसारखी एकामागोमाग एक धडकणारी वादळे, दक्षिण ध्रुवावरील मोठ्या प्रमाणात वितळणारा बर्फ, समुद्राच्या पाणी पातळीत वर्षागणिक होणारी वाढ, मूड बदलत असलेला पाऊस, भूकंपाचे तीव्र धक्के हे दुष्परिणाम पर्यावरणाचे चक्र विचलित होत असल्याचे इशारे आहेत.
विकासाच्या मोहापायी घनदाट जंगले आपण गिळंकृत करत आहोत. कित्येक वर्षांपासून उभी असलेली ही महाकाय निसर्गाची देणगी आपण काही वेळातच भुईसपाट करीत आहोत. वानसे (झाडे) हा निसर्गाच्या साखळीतला प्रमुख दुवा आहे. मात्र घनदाट हरीत क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्याचा थेट परिणाम वातावरणावर होत आहे. घनदाट जंगलांच्या घटत्या प्रमाणामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. हिंसक प्राण्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढला आहे. शहरी भागांत आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच्या उंच इमारती उभ्या राहत आहेत. हे पेव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तसेच ही शहरे विस्तारत आहेत. मोठमोठ्या झाडांची कत्तल करून त्यावर या इमारती उभारल्या जात आहेत. त्याचा मोठा फटका पर्यावरणाला बसत आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे चिमण्यांसह कित्येक पक्षी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घटलेत.
निवाऱ्याच्या शोधात ते स्थलांतर करू लागले आहेत. कारखाने, इमारतीकरण, एअर कंडिशन यामुळे होणारे प्रदूषण हे शुद्ध हवेचा श्वास घुसमटवत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे वायू प्रदूषण आजारांना निमंत्रण देत आहे. प्रदूषित पाणी, प्लास्टिक यामुळे नदी, समुद्रातील पाणी प्रदूषणासह तेथील जीव सृष्टी धोक्यात आली आहे. वाढते प्रदूषण आणि जंगलांवर चाललेली कुऱ्हाड यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यात काँक्रीटचा विळखा संकट अधिक गडद करत आहे. रस्ते, पूल, फ्लाय ओव्हर या विकासाच्या स्पर्धेत झाडे जमीनदोस्त होत आहेतच, शिवाय जमिनीच्या पोटातही आपण हात घालत आहोत. वेगवान प्रवासासाठी उभे राहणारे महामार्ग डोंगर पोखरत आहेत.
सामरिक वर्चस्वातून होत असलेल्या अणू चाचण्या या जमीन, वायू, पाणी या तिन्ही घटकांना धोका पसरवत आहेत. जगात वर्चस्ववादाची जणू स्पर्धाच रंगली आहे. त्यात कोण माघार घेण्याचे नाव घेत नाही. मानवी हव्यास थांबण्याचे नाव घेत नाही. उच्चभ्रू घरे, रस्ते, महामार्ग याच्या मोहापायी आपण पर्यावरणाला मोठा धोका पसरवत आहोत, याचे भान आपल्याला राहिलेले नाही. गरीब, अविकसित, विकसनशील देश याच वाटेने मार्गक्रमण करत असून पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात आणत आहे. हा धोका आपण वेळीच ओळखूया आणि त्यात बदल करूया.
निसर्गासारखा प्रेमळ आणि कठोर कुणीच नाही. देतानाही तो भरभरून देतो आणि चवताळला तर मग भस्मसात करून टाकतो. त्याच्या नम्रतेची आपण परीक्षा नको घेऊया. छोट्याशा जागेवरून माणूस माणसाच्या जीवावर उठतो. उभ्या राहिलेल्या इमारतीला त्या तोडलेल्या जंगलांनी उद्या आपली जागा दाखवली तर?, त्या समुद्राने समुद्री मार्ग, अतिक्रमणे यांच्याकडे बोट दाखवले तर?, त्या पोखरलेल्या डोंगरांनी भुयारी मार्गाकडे अंगुली निर्देश केले तर? पण तसे होत नाही. कारण निसर्ग बोलत नाही. अतिरेक झाल्यास इशारे देतो आणि मग एकदाच आपली जागा दाखवतो. सध्या हे इशारे आपल्याला वारंवार मिळत आहेत.
वेळीच ते ओळखूया आणि पर्यावरणातील ढवळाढवळ थांबवूया. कारण पर्यावरणाच्या आरोग्यावरच या सृष्टीवरील सजीवांचे अस्तित्व अवलंबून आहे. चला वानस्यांशी (झाडांशी) सोयरिक करूया. आपल्या आप्तेष्टांप्रमाणे त्यांची काळजी घेऊया. कारण झाडे हा पर्यावरणाच्या साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विविध प्रकल्पांमध्ये कत्तल केल्या जाणाऱ्या झाडांच्या दुप्पट तिप्पट झाडांची लागवड आपण करूया. त्यासोबतच त्यांचे संवर्धन करूया. शहरांना काँक्रीटच्या विळख्यातून मोकळे करूया. रोपांना रुजून येण्यासाठी शहरांमध्ये मातीचा भाग शिल्लक राहायला हवा. झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण काढून टाकायला हवे. तरच झाडे मोकळा श्वास घेऊ शकतील. कारण त्यांच्या अस्तित्वावरच पर्यावरणाचे आणि पर्यायाने सजिवांचे अस्तित्व अवलंबून आहे.
[email protected]