विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस नवनवीन घटना घडत असल्याचे उघडकीस येत आहे. अशातच विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या या पुण्यात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तारांबळ झाल्याची घटना घडली. SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हडपसरच्या सहयोग डिजिटल केंद्रावर हा प्रकार घडला आहे. SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच गेट बंद करून घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅफिक आणि कामावर जाणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे विद्यार्थ्यांना केवळ १ ते २ मिनिटांचा उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हुजेरगिरी करत गेट बंद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विनवणी करुनही कर्मचाऱ्यांनी गेट उघडले नाही.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच परीक्षा केंद्रावरील गेट बंद केल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.