Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे लोकसभेचा गड नरेश म्हस्केंकडून सर

ठाणे लोकसभेचा गड नरेश म्हस्केंकडून सर

उबाठाच्या राजन विचारेंचा ४२२३ मतांनी पराभव

धर्मवीर आनंद दिघेंच्या दोन शिष्यात रंगला सामना

प्रशांत सिनकर

ठाणे : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजन विचारे तर शिवसेना पक्षाकडून नरेश म्हस्के यांच्यात तगडी लढत होणार असल्याचे सांगितले होते. परंतु निवडणुकीत नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव करत, ठाणे लोकसभेचे ‘खासदार’ झाले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजितदादा गट) व रिपाइं महायुतीची संघटनात्मक ताकद यामुळे शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी शिवसेना उबाठा गटाचे मावळते खासदार राजन विचारे यांच्यावर लिलया मात करीत ‘ठाणे’ गडावर विजयी पताका फडकवली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली होती.

नरेश म्हस्के (शिवसेना) यांना २२६२० इतकी मतं मिळाली तर राजन विचारे (उबाठा सेना) यांना १८३९७ मतं मिळाली. मात्र म्हस्के यांची आघाडी अशीच कायम शेवट पर्यंत टिकून राहिली होती.

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाच्या नरेश म्हस्के आणि उबाठा सेनेच्या राजन विचारे अशा आनंद दिघे यांच्या दोन शिष्यातच लढाई झाली. सुरूवातीला विचारे यांना सहानुभूतीचा फायदा मिळेल अशी चर्चा होती. मात्र तसं काही झाल्याचे दिसले नाही. विचारे यांच्या बऱ्याच जमेच्या बाजू होत्या. विचारे यांची उमेदवारी बरीच आधी जाहीर झाली. त्यामुळे त्यांना हा भलामोठा मतदारसंघ पिंजून काढायला चांगला अवधी मिळाला. त्या तुलनेत नरेश म्हस्के यांची उमेदवारी ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या थोडी आधी जाहीर झाली. त्यामुळे म्हस्के यांना प्रचारासाठी अवघे काही दिवसच मिळाले. राजन विचारे हे सलग दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. तर म्हस्के हे ठाण्याचे महापौर होते. शेवटी ठाणेकरांनी एकनाथ शिंदे गटाला कौल दिला आहे. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचीच मोहोर मतदारांनी उमटवली आहे. या मतदारसंघावरून शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये बरीच ताणाताणी झाली. पण अखेर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण २५ लाख ८ हजार ७२ मतदार असून पैकी १३ लाख ६ हजार १९४ म्हणजेच ५२.०९ टक्के इतके मतदान झाले होते. ठाणे लोकसभा क्षेत्रात मराठी मतांचा टक्का ५१ टक्के म्हणजेच १२ लाख ९५ हजार तर त्या खालोखाल उत्तरभारतीय ५ लाख ४७ हजार ९१२, मुस्लिम २ लाख ९८ हजार ८६१, गुजराती व इतर १ लाख ७४ हजार, पंजाबी व सिंधी – ४९ हजार आणि व इतर समाजाच्या मतदारांची संख्या ५० हजार एवढी आहे. या सर्वानी मोदी यांच्या आश्वासक चेहऱ्याकडे पाहुन विचारेना चारी मुंड्या चीत करीत म्हस्के यांच्या गळ्यात विजयमाला घातली. विद्यार्थी सेना, शाखाप्रमुख, नगरसेवक ते आता खासदार अशी वाटचाल करणाऱ्या खा. नरेश म्हस्के यांना आता स्वतःला बदलुन स्थानिक राजकारणा बाहेर पडुन देशाच्या विकासात ठाण्याचे योगदान देण्यासाठी झटावे लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -