मुंबई : काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेकडून (Central Railway) घेण्यात आलेला ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) संपल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मध्य रेल्वेवर आज पहाटे ४. ४० वाजता परळ (Parel) रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे परळ रेल्वे स्थानकातून लोकल कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मध्य रेल्वे सेवेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, घटनास्थळी रेल्वे कर्मचारी व अधिकारी पोहोचले असून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.