महाराष्ट्रातही महायुतीने बालेकिल्ले राखले
मुंबई : लोकसभा निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीगणिक होत असलेल्या मतांतील फरकांमुळे अनेकांचे ठोके चुकत आहेत. देशपातळीवर एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. मात्र, तरीही एनडीएने मतमोजणीत पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. एनडीएची सध्या ३०० हून अधिक जागांवर आघाडी आहे.
गांधीनगरमध्ये अमित शाह यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी आघाडी मिळवली आहे. तर वाराणसीतून देखील नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. हिमाचलच्या मंडीमधून कंगना रनौत ३६ हजार मतांनी आघाडीवर आहे, तर ९९,१९६ मतांनी हेमामालिनी आघाडीवर आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सध्या अनेक जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. मात्र भाजपाने आपले वर्चस्व असलेल्या कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी नारायण राणे ७ हजार मतांनी पुढे आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील तटकरे ३३ हजार मतांनी पुढे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या ठाणे व कल्याणमध्ये आघाडी कायम राखली आहे.