Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखज्येष्ठ सुरू होतोय...

ज्येष्ठ सुरू होतोय…

स्वाती पेशवे

चैत्र, वैशाखात भाजून निघाल्यानंतर ज्येष्ठाची आस न वाटली तरच नवल…! ज्येष्ठ केवळ पाऊसच घेऊन येत नाही, तर करपलेल्या स्वप्नांवर आशेची पेरणी करत येतो. या काळात बरसणाऱ्या सरींमध्ये रिते कुंभ भरवून टाकण्याची शक्ती आहे. दोन-चार जोरदार सरीही निसर्गातील शुष्कता हटवू शकतात, असा पाण्याच्या एका-एका थेंबासाठी सुरू असणारी निसर्गाची आराधना संपवणारा ज्येष्ठ सुरू होतोय. त्याचे सहर्ष स्वागत करू या.

ज्येष्ठ येतोय. इंग्रजी वर्षाचा जवळपास निम्मा काळ संपल्यानंतर येणारा हा तिसरा मराठी मास. एक ऋतू संपून दुसऱ्याच्या प्रारंभीचा काळ. सर्जनाचे नवे पर्व सुरू होण्याचा हा काळ. अशा वेगवेगळ्या अर्थाने ज्येष्ठाचे महत्त्व जाणवते. ज्येष्ठ हा शुष्कता आणि ओलावा यांच्यामधला दुवा आहे. हा निरभ्रता आणि भारलेपणा यांची सांधेजुळणी करणारा काळ आहे. म्हटले तर फटफटीत उजेडापासून कडुसं आलेल्या काळापर्यंतचा तो लहानसा प्रवास आहे; पण तोच सर्जनशील असल्यामुळे अत्यंत मोहक आणि रमणीय आहे. चैत्र आणि वैशाख तापतो. निसर्ग एखाद्या भट्टीसारखा रसरसतो. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात तर ही धग असह्य होतीये. आधीच सिमेंट काँक्रिटने वेढलेल्या जंगलात कसाबसा तग टिकून राहणारा निसर्ग या धगीत अगदी होरपळून जातो. तो उद्रेक सजीवसृष्टीलाही त्रासदायक ठरतो. नदी-नालेच नव्हे; तर जणू जीवनप्रवाहालाच ओढ बसते. असे असताना त्या ‘आ’ वासून पडलेल्या जमिनीबरोबरच प्रत्येकाला पावसाची ओढ लागते. कधी एकदा ही रखरख संपते आणि थंडगार हवेचा झोत स्पर्श अंगाला करुन जातो, असे होऊन जाते. कारण वाढता ताप थेट जगण्याच्या इच्छेला, ऊर्मीला, चेतनेला दाह देतो. म्हणूनच ज्येष्ठामध्ये आभाळात काळी किनार दिसू लागते आणि पावसाचे टपोरे थेंब शपण करू लागतात, तेव्हा निसर्गाबरोबरच प्रत्येक जीवातली जीवनेच्छाही सुखावते.

सर्जनाचा हा सांगावा आगामी समृद्धीचे पदरव ऐकवून जातो. बहुप्रतीक्षेनंतर वेगवान वाऱ्यांमुळे हलणारी सृष्टी एखाद्या देखण्या नर्तकीसारखी भासू लागते. वृक्षलतांचे तेथे डौलदार हदोळणे तनामनाला मोहीत करून जाते. या तालात चैत्रामध्ये फुटलेली पालवी आणखी उजळून निघते, अधिक टवटवीत होते. म्हणूनच ज्येष्ठ देखणा आणि संपन्न वाटतो. अशा भारलेल्या वातावरणात मध्येच लख्खकन प्रकाशमान होणारी शलाका नाचून जाऊ लागते. अशातच छाती दडपून टाकणारा तो नगारा घुमू लागतो आणि सरसर जमिनीवर उतरणारे टपोरे थेंब जमिनीच्या रोमारोमात सामावू लागतात. भन्नाट वाऱ्याच्या झोतात सैरावैरा उडणारा पाचोळा या दृश्याला वेगळीच नाट्यमयता देतो आणि ज्येष्ठ अवतरल्याची खात्री पटते. असा हा ज्येष्ठ… अग्नीकुंभाकडून जलकुंभाकडे नेणारा… स्वप्नांची साखरपेरणी करणारा, बहरत्या आशावेलींना आधार देणारा…

ज्येष्ठ अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. जीवनशैलीमध्ये सुंदर बदल घडवून आणणारा आहे. वळवाची झडाझडी संपल्यानंतर मान्सून वाऱ्यांचा सुंदरसा गोफ विणणारा आहे. समुद्राला उधाण आणणारा आहे. आटलेले झरे, ओढे-नाले प्रवाहित करणारा आहे. म्हणूनच जीवसृष्टीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अद्वितीय आहे. हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच ज्येष्ठात निसर्गासमीप नेणाऱ्या सणांचे प्रयोजन असते. वटपौर्णिमा हा त्यातलाच एक सण. वडासारख्या फलदायी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पौराणिक कथांचे, आख्यायिकांचे कोंदण या सणाला धार्मिक मूल्य देऊन जात असले, तरी मुळात वृक्षसंवर्धन हाच यामागील मूळ हेतू आहे, हे आता अनेक जण जाणतात. त्यामुळे या सर्जनपर्वात आता निसर्गरक्षणाचे, वनीकरणाचे अनेक उपक्रम हाती घेतले जातात. विविध स्वयंसेवी, पर्यावरणप्रेमी संस्था या कामी पुढाकार घेतात. विद्यार्थी, कॉर्पोरेट क्षेत्र, ज्येष्ठांच्या संघटना वनीकरणाच्या या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देतात. हाती सीड बॉल, हिरवीगार रोपं, विविध प्रकारच्या बियांनी भरलेल्या पिशव्या घेऊन निघालेली निसर्गरक्षकांची ही उमदी फळी बघितली की, वाढत्या असंतुलनाची काळजी काही अंशी तरी कमी होते आणि आपणही किमान एक झाड लावावे, वाढवावे ही भावना जन्म घेते. ज्येष्ठात पार पडणारे वृक्षारोपणाचे कार्यक्रम समाजमनाला प्रोत्साहित करणारे ठरतात.

याचा सर्वात मोठा आणि फलदायी ठरणारा प्रयोग वारीच्या निमित्ताने अलीकडच्या काळात आपण पाहत आहोत. भक्तांना घेऊन निघालेली ही विशाल सरिता विठ्ठलरूपी सागराच्या दिशेने जायला निघते, ती याच महिन्यात. ज्येष्ठात अनेक संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. पूर्वी हा केवळ भक्तीचा महापूर असायचा. मात्र आता त्यात अनेक जाणिवांचे प्रवाहही मिसळत आहेत. उदाहरणार्थ, पावसाळ्यात पार पडणारी ही वारी स्वच्छता, निसर्गरक्षण, संवर्धन आणि वनीकरणाचा संदेश अतिशय सक्षमतेने सर्वदूर पसरवत आहे. हजारोंच्या संख्येने वारी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे बिया देऊन, त्यांच्यामार्फत त्या वारीच्या मार्गातल्या उजाड माळरानांवर पसरवणे आणि त्यायोगे हिरवाई वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्नही जोरकसपणे राबवला जाताना दिसत आहे. मुख्य म्हणजे त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हा बदल निश्चितच दखलपात्र आहे.

ज्येष्ठाचा महिना हा पावसाची नव्हाळी अनुभवण्याचा काळ आहे. पावसाची रिपरिप, संततधार सुरू होण्यापूर्वीचा हा काळ एक वेगळीच वातावरणनिर्मिती करतो. या काळात जमिनीतला कोरडेपणा इतका टोकाचा असतो की, ती पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे आचमन करत असते. सहाजिकच पाणथळ साठतेय, डबकी भरलेली आहेत, त्यावर डास, माशा घोंघावत आहेत, कुंद हवेमुळे रोगजंतू पसरण्याचा धोका उत्पन्न झाला आहे, असे कोणतेही चित्र या काळात दिसत नाही. म्हणून पर्यटकांसाठीही हा सुवर्णकाळच असतो. एखाद-दुसरी जोरदार सर येऊन गेली की, निसर्ग हिरवाईसाठी कवाडे पूर्णपणे उघडतो. मग जादू घडावी, त्याप्रमाणे चार-दोन पावसातच धुळीत हरवलेल्या पायवाटा हिरव्या होतात. ओल्या मातीचा सुगंध वेडावून टाकू लागतो. वाहत्या वाऱ्यामध्ये असणारा पाण्याचा अंश हवाहवासा गारवा देऊन जातो. अशा या वातावरणात आतापर्यंत कृत्रिम गारव्याचा झोत झेलून वैतागलेले शरीर आणि मन स्वच्छंदी पाखराप्रमाणे बाहेर पडू पाहते. कारण केवळ हा सगळा बदल बघून समाधान होत नाही, तर तो अनुभवण्यासाठी, रंध्रारंध्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी जणू निसर्गच आपल्याला साद घालत असतो.

बदलत्या निसर्गाला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाकडी वाट करून लोकांचे जत्थे हिरवाईमध्ये दडलेल्या अनवट वाटा पालथ्या घालत आहेत. धरणक्षेत्रांवर गर्दीचा महापूर बघायला मिळत आहे. अलीकडच्या काळात पाऊसकाळात दिसणारे हे परिचित चित्र आहे. हा ज्येष्ठाचा नव्याने परिचय करून घेण्याचा प्रयत्न आहे, असेही आपण म्हणू शकतो. पूर्वी शेतात राबताना, पायी प्रवासात गाव-जंगले ओलांडताना सहज अनुभवता येण्याजोगा हा बदल निरखण्यासाठी आता खास नियोजन करावे लागते, इतकेच. त्यात चुकीचे काहीही नाही. मात्र निसर्गाचे हे बदलते रुप अनुभवताना सजगता बाळगायला हवी. हे मात्र नक्की. ही बेशिस्त गर्दी निसर्गहानीचे मुख्य कारण ठरत असल्याचे समोर येत असताना, आता तरी आपण नियमांचे पालन करण्याची गरज ओळखायला हवी.

ज्येष्ठातले हे दिवस जलभरणाचे आहेत. रिती झालेली पात्रे भरताना एखाद्या गृहिणीला किती प्रयास घ्यावे लागतात! इथे तर जमिनीवरचा आणि जमिनीखालचा असे दोन्ही जलस्तर पूर्णपणे आटलेले असताना, पडणारा प्रत्येक थेंब किती महत्त्वपूर्ण असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच तो साठवण्याचा आणि मुरवण्याचा प्रयत्न अगदी व्यक्तिगत पातळीपासून व्हायला हवा. उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारे आक्रंदन थांबवायचे असेल, तर आधी आपण निसर्गावरचे अतिक्रमण थांबवणे गरजेचे आहे, हे आता तरी जाणून घ्यायला हवे. सोसायट्यांमध्ये, घरांमध्ये पावसाचे पाणी साठवायचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्याची माहिती घेणे आणि शक्य तशी अंमलबजावणी करणे हे आता प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. हा वसा घेतला, तर येणारा काळ सुख आणि सौख्य दाखवून देईल, अशी स्वप्ने आपण पाहू शकतो. शेवटी उंची महालांमध्ये राहण्याची स्वप्ने असली, तरी ती पावसाच्या पाण्यावरच पोसतात. ज्येष्ठातला हा पाऊस त्या दृष्टीने साठवायला हवा. त्याचा प्रवाह आपणच केलेल्या अवाढव्य कचऱ्यात, अतिक्रमणांच्या विळख्यात अडकणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अमृताचे प्रतिरुप असणारे हे पाणी शक्य तितके शुद्ध ठेवणे,- हे तुम्हा-आम्हा प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -