नागपूर : येत्या ३ जुलैपासून बीएससी नर्सिंगच्या (BSC Nursing ) चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र तिसऱ्या सत्रात एटीकेटीधारक (ATKT) विद्यार्थ्यांसाठी चौथ्या सत्राचे पेपर देणे महागात पडणार आहे. आरोग्य विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences) बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना एकाच दिवशी सलग सहा तास पेपर लिहावा लागणार असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने बीएससी विद्यार्थ्यांच्या चौथे सत्र त्यासोबत तिसऱ्या सत्रातील एटीकेटी परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर द्यावे लागणार आहेत. आरोग्य विभागाच्या या वेळापत्रक नियोजनाबाबत राज्यातील चार शासकीय तसेच दिडशेवर खासगी बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये चर्चा केली जात आहे.
असे असेल परीक्षेचे नियोजन
१० आणि १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता पेपर आहे. पेपर सुरू होण्याच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर या अशी सूचना आहे. यामुळे ९ वाजता केंद्रावर यावे लागेल. सकाळी १० वाजता सुरू झालेला पेपर १ वाजता सुटेल. त्यानंतर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना लगेचच दुपारी २ ते ५ या वेळेत असणारा दुसरा पेपर सोडविण्यासाठी जावे लागणार आहे.
दरम्यान, विद्यार्थी पंधरा ते वीस मिनिटांत कुठे पाणी पिणार, कुठे जेवण करणार, विद्यार्थी उपाशीपोटी पुन्हा पेपर लिहिण्यासाठी केंद्रावर जाणार. त्यादरम्यान विद्यार्थी भोवळ येऊन पडल्यास किंवा त्याच्यावर जिवावर बेतणारा प्रसंग आल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.