मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आश्चर्याचा धक्का
नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी निवडणूक आयोगाच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्त
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या निवडणुकीत एक ‘जागतिक विक्रम’ झाल्याचे सांगितले. तसेच मतदान कसे पार पडले. तसेच सात टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली.
इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘लापता जेंटलमैन वापस आ गए’ मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. आचारसंहिता काळात १० हजार कोटी रुपयांची कॅश, वस्तू जप्त करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांनी उभे राहून भारतातील मतदारांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी सांगितले की, आम्ही वयोवृद्धांकडून अर्थात ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करवून घेतले. भारतात ६४२ मिलियन अर्थात ६४ कोटी मतदार आहेत. मतदारांची ही संख्या जगातील २७ देशांतील मतदारांहून पाच पट जास्त आहे. इतक्या मोठ्या संख्येने देशात लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. आपण या निवडणुकीत जागतिक विक्रम केला आहे.
दरम्यान, सात टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, या संपूर्ण निवडणूक कार्यक्रमासाठी १.५ कोटी मतदान आणि सुरक्षा रक्षकांसाठी १३५ विशेष रेल्वे गाड्या, ४ लाख वाहने आणि १६९२ फ्लाईट्सचा वापर केला गेला. यामध्ये ६८,७६३ मॉनिटरिंग टीम निवडणुकीवर लक्ष ठेऊन होत्या. या निवडणुकीत मोठ्या ब्रँडसह स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिले होते.
तसेच ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यंदाची निवडणूक १ जूनपर्यंत लांबली होती. ४ जूनला मतमोजणी होणार आहे. आयोगाच्या नव्या घोषणेनुसार भविष्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात मतमोजणी होणार आहे. म्हणजेच मार्चमध्ये जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जाणार आहे.
महिला मतदारांची संख्या महत्त्वाची होती. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील. ३१ कोटींहून अधिक महिला मतदारांनी मतदान केले. मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे. निवडणूक उत्साहात पार पडली आहे. आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचे करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळे बळकट करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो, असे राजीव कुमार यांनी म्हटले आहे.