वकिलीचं घेत होती शिक्षण
मुंबई : मुंबईतून एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) यांच्या मुलीने राहत्या घराच्या इमारतीतील १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याने (IAS officer daughter commits Suicide) खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना मंत्रालयासमोरच (Mantralaya) घडली. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणं ही साधी गोष्ट नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे. तिथे १० व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. त्यांची मुलगी २७ वर्षांची होती व ती एलएलबीचं (LLB) शिक्षण घेत होती. तिने रात्रीच्या सुमारास दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येमागे काय कारण आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काहीतरी माहिती समोर येऊ शकते. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.