
कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण संपूर्ण देशात गाजत असतानाच आज कोल्हापूर शहरात देखील असाच एक भीषण अपघात (Kolhapur accident) झाला. या अपघातात भरधाव वेगात असलेल्या कारने येथील कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या सायबर चौकात चार-पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या चौकात वाहतूक सुरू असताना अचानक एका भरधाव कारने राजारामपुरीकडून येताना चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सायबर चौक हा राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम कॉलेजला जोडतो आणि या चौकात मोठी गर्दी असते. या चौकात अनेक शाळा आणि सायबर कॉलेज आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून कार चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. गंभीर जखमी असलेल्यांवर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.