Thursday, November 14, 2024
Homeक्राईमCrime news : पाणीकपातीमुळे आंघोळ न करण्याच्या सल्ल्यावरुन नवरा भडकला! बायकोवर केले...

Crime news : पाणीकपातीमुळे आंघोळ न करण्याच्या सल्ल्यावरुन नवरा भडकला! बायकोवर केले चाकूने वार

तर दुसरीकडे वाढदिवसाला केक उशिरा आणल्याने संतापलेल्या पतीने पत्नी व मुलावर केला चाकूहल्ला

साकीनाका येथील दोन अमानुष घटना

मुंबई : हल्ली कोणतीही गोष्ट मनासारखी घडली नाही की टोकाला जाण्याचे प्रकार इतके वाढले आहेत, की यातून थेट जीवघेणा हल्ला करण्याच्या घटना (Crime news) घडतात. अशाच दोन अमानुष घटना मुंबईच्या साकीनाका परिसरातून (Sakinaka) समोर आल्या आहेत. सध्या मुंबईत पाणीकपात (Water cut) सुरु असल्याने पत्नीने पतीला आंघोळ करु नका, या दिलेल्या सल्ल्यावर पती इतका भडकला की त्याने थेट पत्नीवर चाकूने वार केले. तर दुसर्‍या घटनेत केवळ वाढदविसाला केक उशिरा आणल्याने संतापलेल्या पतीने पत्नी व मुलावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनांमुळे राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे तसेच मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने पाच टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. पाणीकपातीमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याच पाणीकपातीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी परमात्मा गुप्ता आणि त्याची पत्नी मीरा हे साकीनाका येथील टिळक नगर येथे राहतात. शनिवारी उन्हातून घरी आल्यानंतर घामाने भिजल्यामुळे परमात्मा गुप्ता यांनी आंघोळ करण्याचे ठरवले. पण पत्नीने त्यांना आंघोळ करण्यास मनाई केली. बीएमसीची पाणीकपात सुरू आहे आणि पाण्याची बचत केली पाहिजे, असा सल्ला तिने दिला. यामुळे परमात्मा आणि त्यांच्या पत्नीमध्ये बाचाबाची झाली.

हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने चाकूने पत्नीवर हल्ला केला. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. साकीनाका पोलीस ठाण्याच्या पथकाने परमात्माला त्याच्या राहत्या घरातून उचलून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

वाढदिवसाला केक उशिरा आणल्याच्या रागातून केला हल्ला

तर दुसरीकडे वाढदिवसाला केक उशिरा आणल्याच्या रागातून पतीने चाकूने पत्नी व मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात आरोपीची पत्नी रंजना शिंदे व सुनिल शिंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पत्नी रंजना शिंदेंनी दिलेल्या तक्रारीनुसार साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र शिंदेवर भादवी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी राजेंद्र यांचा वाढदिवस असल्याने पत्नी व मुलाने केक आणण्यास उशीर केल्यावरून राजेंद्र व रंजना यांच्याच वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेले राजेंद्र पत्नीच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात होते. त्यावेळी सुनिलने त्यांना अडवले. पाहता पाहता राजेंद्र यांनी घरातील भाजी कापायच्या चाकूने मुलाच्या पोटावर खांद्यावर तर रंजना यांच्या मनगटावर वार करत त्यांना जखमी केले. क्षुल्लक कारणांवरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची साकीनाक्यातील ही दुसरी घटना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -