निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
”टूकन” हा जगातील सर्वात अनोखा पक्षी आहे. हा पक्षी निओट्रॉपिकल सदस्य म्हणजे निओट्रॉपिकल क्षेत्रातील उष्ण कटिबंधीय वर्षावने ज्यामध्ये दक्षिण-उत्तर अमेरिका, मेक्सिको, फ्लोरिडा, अर्जेंटिना, कॅलिफोर्निया इत्यादींचा समावेश आहे. हा भारतात आढळत नाही, तर हा परदेशी पक्षी आहे. ‘टूकन’चा अमेरिकी अर्थ मोठी आणि रंगीबेरंगी चोच, चमकदार पंख असणारा पक्षी. शब्दशः अर्थ संलग्न असा होतो. आता संलग्न असा हा शब्द कशामुळे आला असावा, तर त्यांच्या चोचीचा विशिष्ट आकार जो दोन करवती एकमेकांमध्ये बसवल्यासारखा असतो. बहुतेक त्यामुळे हा शब्द आला असावा. रन फास्ट डे अमेरिकी बार्बेट्सबरोबर याचा अधिक जवळचा संबंध आहे. यांच्या ४० पेक्षा अधिक प्रजाती आहेत असे म्हटले जाते. हे टूकन व्हेनेझुएला, त्रिनिदाद, उत्तर ब्राझील येथे सुद्धा आढळतात. यांचा आकार आणि वजन प्रजातींनुसार बदलते. सर्वात मोठ्या टूकनची लांबी २४ इंच आणि सर्वात लहान टूकनची लांबी १२ इंच आहे.
कावळ्यासारखा दिसणारा पण लांब आणि रंगीबेरंगी चोचीमुळे टूकन खूप प्रसिद्ध आहे. त्यांची चोच अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते. वेगवेगळ्या प्रजातींनुसार त्यांच्या चोचीच्या रंगछटा बदलतात. मी आतापर्यंत विविध पक्षी पाहिलेत पण फक्त याच पक्षांची चोच वैविध्यपूर्ण आहे. कधी कधी असे वाटते की, कोणीतरी त्याच्या चोचीला रंग दिला आहे आणि सुबक पद्धतीने कातरली सुद्धा आहे. ही चोच कपाळापासून ते गळ्यापर्यंत एवढी जाड आणि लांब असते. अतिशय सुंदर रंगसंगती असलेली ही चोच एखाद्या करवतीसारखी प्रभावशाली वाटते. चोची त्यांच्या शरीराच्या अर्ध्या भागापेक्षा जास्त लांबीच्या असतात आणि हीच त्यांची ओळख आणि वैशिष्ट्य आहे. जरी ही चोच मोठी दिसत असली तरी वजनाने खूपच हलकी असते. कारण यातील हाडांच्या रचनांमध्ये स्पंजी ऊतक म्हणजेच बायोफोमच्या संरचनेच्या असतात. यांची लांब जीभ यांना अन्न शोधण्यास मदत करते.
यांच्या प्रजातींमधील पक्ष्यांचे पंख हे निळसर, जांभळट, तपकिरी, राखाडी ज्यात लाल नारंगी, पिवळा, काळा, सफेद रंग असतो. हे पक्षी फक्त जंगलातील फळे खाण्यासाठीच निर्मित झालेले आहेत. त्यामुळे यांची शारीरिक रचना पूर्णपणे तशीच बनलेली आहे. यातील बरेचसे पक्षी सर्वाहारी असतात म्हणजे किड्यांची शिकारसुद्धा करतात. खूपदा इतर पक्ष्यांची घरटी सुद्धा ते लुटतात. हे पक्षी अशा पद्धतीने झोपतात की एखाद्या चेंडूच्या आकाराचे वाटतात. या टूकनचा आवाज बऱ्याचदा बेडकासारखा येतो. ते काही विविध ध्वनी निर्माण करतात. कधी कधी त्यांचा कलकलाट खूपच कर्कश्य वाटतो.
त्यांच्या चोची एकमेकांवर आपटून ते विशिष्ट आवाज काढतात. बहुधा हे त्यांचे एकमेकांसाठी कॉलिंग असतं. सुतार पक्ष्यांसारख्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या झाडांच्या ढोलींना स्वतःची घरटी बनवतात. हे पक्षी दोन ते चार पांढरी अंडी देतात. यांच्या एकंदरीत शारीरिक रचनेमुळे हे जास्त उडू शकत नाहीत. त्यामुळे जास्त वेळ हे झाडांवरच बसून घालवतात. हे प्रवासी पक्षी नाहीत; परंतु आश्चर्य म्हणजे सध्या पुण्यामध्ये हे पक्षी काही ठिकाणी दिसून आले आहेत; परंतु या त्यांच्या प्रजाती आहेत, हे लहान लहान झुंडीत किंवा जोडींमध्ये राहतात. हा पक्षी १३० ग्रॅमपासून ते ६८० ग्रॅमपर्यंत असू शकतो. यांची लांबी ११ इंचांपासून ते पंचवीस इंचांपर्यंत असते. यांची शेपूट छोटी आणि गोलाकार असते. यांचे पंख लहानच असतात. त्यामुळे ते स्थलांतरित होऊ शकत नाहीत. जंगलात तिथल्या तिथेच फिरतात. यांचे पाय मजबूत आणि लहान आहेत. यांच्या बोटांची रचनासुद्धा झाडांच्या फांद्या पकडण्यासाठी मजबूत झालेली आहे. निसर्गाला त्यांचे संरक्षण योग्य पद्धतीने करता यावे यासाठीच परमेश्वराने यांचे रंग त्या त्या वातावरण निर्मितीप्रमाणे रंगीत केले आहेत. म्हणूनच आपल्याला बऱ्याचदा पक्षी झाडांमध्ये लवकर दिसत नाहीत.
लेट बेल्ट माऊंटन, क्रिमझन रम्प, चेस्टनट मंडीबेल, आयवरी बिल आराकारी, चेनलबील, किलबिल टूकेन अशा अनेक प्रकारच्या यांच्या प्रजाती आहेत. चेस्टनट मंडीबेल यांचे डोळे म्हणजे पोपटी कडांमधील काळी बुबुळ, बाजूला पिवळ्या रंगाचे पंख आणि गळ्याकडे पांढऱ्या रंगाचे गोलाकार आकारातील पंख, पूर्ण पाठ आणि पोट काळे, शेपटाकडील अर्धा भाग पांढरा आणि काळा, शेपटीच्या खालच्या भागांमध्ये लालसर पंख, पिवळ्या लाल रंगाची चोच, चोचीच्या पुढे काळ्या रंगाचा डाग असा एकंदरीत दिसतो. मेनी बॅण्डेड आराकारी हा व्हेनेझुएला, कोलंबिया इत्यादी ठिकाणी आढळतो. याची चोच वरून पिवळी, अर्धी खाली काळी असून, डोक्यापासून गळ्यापर्यंत पूर्ण काळ्या रंगाचे पंख, त्यानंतर पूर्ण पिवळ्या रंगाचे पोट, त्यावर काळा आणि लाल रंगाचा आडवा पट्टा असल्यामुळे याला मिनी बँडेड आराकारी म्हणतात.
विशेषतः याचा डोळा पांढरा असून काळा ठिपका असतो आणि बाजूला पानांच्या आकाराचा करडा हिरवट आकार असतो. पाठीवर पूर्ण काळे पंख असून शेपूट सुरू होण्याच्या ठिकाणी थोड्या लालसर पंखांचा झुपका आणि काळी शेपूट असते. चेस्टनट इअर आराकारी हा साऊथ अमेरिकेचा आहे. याची चौकोनी अशी कातरलेली चोच अतिशय आकर्षक वाटते. वरच्या आणि खालच्या चोचीला चेन लावल्यासारखी दिसते. टोकोटुकन हे जायंट प्रजातीमध्ये मोडतात. टोकोटूकन चोचीची हलकी वजनाची ताकद हाडाच्या तंतूंच्या मॅट्रिक्समुळे आहे. यांची शेपटी लहान आणि गोल आकाराची असते. त्यांच्या लहान पंखांमुळे, त्यांना उडताना खूप फडफडावे लागते आणि म्हणूनच ते बहुतेक झाडांवर बसतात. प्रत्येक पक्ष्याच्या शरीराचा आकार, त्याच्या चोची, डोळे आणि पायांची रचना ही निसर्ग नियमानुसारच असते.
टुकनच्या चोचींना आकर्षित होऊनच मी यांची कलाकृती साकारली. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या प्रजाती कशा निर्माण झाल्या असतील? थोड्याफार एकमेकांच्या जवळपास दिसणाऱ्या पण तरी रंगांमध्ये फरक. तर याचे मूळ कारण असे आहे की, साधारण एकमेकांसारख्या दिसणाऱ्या पक्ष्यांशी हे जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा जी नवीन प्रजाती निर्माण होते ती वातावरणानुसार सुद्धा असते. खरं तर हा विषय गहन आहे केव्हातरी यावर विश्लेषण करून सांगेन. या कलाकृतीत टोको टूकन आणि अनेक बॅन्डेड अराकारी फांदीवर बसले आहेत. ते दोघेही पिवळ्या-केशरी-काळ्या रंगाचे असून केशरी फळांच्या झाडावर बसलेले आहेत. पशू-पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःसारख्या साम्य असणाऱ्या झाडांवर किंवा फुलांवरच बसतात. या रंगांमध्ये त्यांची सरमिसळ झाल्यामुळे ते नैसर्गिकरीत्या संरक्षित केले जावेत म्हणून ते अधिक फळे खातात.
टूकनला रंगीबेरंगी फळे खायला आवडतात आणि जंगलात राहायला आवडते. जंगलात त्यांचे वय किमान १८ वर्षे असते. घुबड, घार आणि गरुड यांसारखे पक्षी त्यांची शिकार करतात. आपण माणसं त्यांची जास्त शिकार करतो आणि वृक्षतोड करतो. त्यामुळे त्यांची प्रजाती असुरक्षित आहे. हा यांच्या अद्भुत रूपामुळे खूप प्रसिद्ध आणि आकर्षक पक्षी असल्यामुळे बऱ्याचदा यांची चोच, पंख यांचा सजावटीमध्ये उपयोग केला जातो. त्यांच्या सुंदर चोचींमुळे त्यांची तस्करी केली जाते आणि मैत्रीपूर्ण असल्यामुळे ते मानवासाठी हानिकारक नसतात म्हणूनच त्यांचा छंद म्हणून संगोपनही केले जाते. यांची शिकारही खूप केली जाते. टूकनचा उपयोग मीडियामध्ये पण खूप केला जातो. पोकेमोन, टूकेनॉन अशा रचनांचा विकास मीडियामध्ये दिसतो. हे जिथे राहतात त्या क्षेत्रामध्ये यांचे आध्यात्मिक महत्त्व आहे. यांना वाईट आत्म्याच्या स्वरूपात राक्षस मानले जाते. पण जंगलातील आदिवासी हे पक्ष्यांना औषधी आणि परमेश्वरी स्वरूपात मान देतात. एक गोष्ट वारंवार माझ्या लक्षात आली ती अशी की, परमेश्वराने जीवसृष्टी आणि निसर्गसृष्टी यांची केलेली ही रचना एकमेकांना पूरक अशीच आहे. मानव कोणतीही गोष्ट जबरदस्तीने निसर्गावर किंवा कोणत्याही जीवसृष्टीवर लादू शकत नाही.
किंबहुना निसर्गनियम असा आहे की, त्याच्या नियमानुसारच प्रत्येक जीवजंतू निर्मित असून निसर्गाच्या कायद्यानेच त्याला त्याचे जीवन जगावे लागेल; परंतु मानव निसर्ग नियमांचे कधी पालन करतो का?
मोठा कावळा दिसत असला तरी चमकदार पंख, रंगीबेरंगी आकर्षक नक्षीदार मोठ्या चोचींसाठी प्रसिद्ध असणारा, बीजरोपणात अग्रेसर, निरुपद्रवी, शांत असा हा टूकेन. आता याच्या प्रजातीही नामशेष होत आहेत कारण… मानव. मानव एखाद्या राक्षसासारखा त्यांच्यासाठी घातक झाला आहे, एखाद्या ऑक्टोपससारखं स्वतःच्या स्वार्थासाठी हातपाय पसरवणारा हा मानव त्यांच्या वास्तव्यांपर्यंत पोहोचून त्यांचं जगणं असह्य करतोय. पर्यावरण असंतुलनाचं मूळ कारण वृक्षतोडच आहे हे सर्वश्रुत असलं तरीही या बुद्धिमान मानवाला याची उपरती कधी होणार
कोण जाणे?
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com